ओटवणेत भरतात वाडीवार वर्ग

महेश चव्हाण
Saturday, 17 October 2020

वाडीवार या छोट्या शाळेने सध्या विद्यार्थांचा आनंद तर वाढवलाच आहे. त्याशिवाय पालकांची चिंताही काहीशी कमी झाली आहे.

ओटवणे (सिंधुदुर्ग) - जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा शाळेबाहेरील शाळेच्या उपक्रमाने ओटवणेत पुन्हा एकदा विद्यार्थांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. शाळा जरी छोटी असली तरी मुलांच्या उत्सुकतेची परिसिमा गाठली आहे. शाळेचा आनंद, वर्गातून दुरवलेल्या मित्र-मैत्रिणी, डोळ्याआड झालेला फळा, चुकलेल्या मित्राला शिक्षकाकडून मार खाताना पाहण्याची मजा आणि नवीन शिक्षक या गोष्टी बऱ्याच कालावधीनंतर एकत्र आल्याने पुन्हा एकदा विद्यार्थी आनंदाने दप्तर घेवून बाहेर पडू लागले आहेत. वाडीवार या छोट्या शाळेने सध्या विद्यार्थांचा आनंद तर वाढवलाच आहे. त्याशिवाय पालकांची चिंताही काहीशी कमी झाली आहे. 

लॉकडाउननंतर मुलांच्या शिक्षणाचा मोठा गहन प्रश्‍न निर्माण झाला होता. शाळाच नसल्याने अभ्यास सोडून घरात दंगा मस्ती करणारी छोटी मुले पालकांच्या चिंतेचा मोठा विषय बनत होती. याला पर्याय म्हणून प्रथमतः ऑनलाईन अभ्यासक्रम देवून मुलांना धडे गिरविण्यासाठी पुढाकार शिक्षकाकडून घेण्यात आला. हा प्रयोग शहरी भागात यशस्वी होवू लागला; पण ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने तसेच महागडे मोबाईल पालकांकड़े नसल्याने या पद्धतीत मोठ्या अडचणी येवू लागल्यात. हातात मोबाईल मिळाल्यानंतर लहान मुलांकड़ून त्याचा गैरवापर किंवा सतत मोबाईलवर अभ्यास असल्याने डोळ्यांना त्रास या गोष्टी अडचणीच्या ठरू लागल्या. त्यातच कोरोनाचा वाढता फैलाव पाहता शाळा लवकर सुरू होण्याबाबत साशंकताच आहे.

या सर्व समस्यांना सुंदर पर्याय शोधत जिल्हा परिषद शिक्षण विभाग, ग्रामपंचायत, स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि पालकांच्या संयोगातून शाळेबाहेरील शाळा या संकल्पनेचा जन्म झाला. यामध्ये वाडीवार व इयत्तेनुसार विद्यार्थ्यांची विभागणी करून वाड्यातच सोइस्कर घरामध्ये वर्ग भरले जावू लागले. यासाठी मुख्याध्यापक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक उच्च शिक्षित युवक, युवती, महिलांची शिक्षण मित्र म्हणून निवड करुन त्यांच्या हाती ज्ञानार्जनाची धुरा देण्यात आली. 

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या या कालखंडात सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत वाडीवार या छोट्या मुलांच्या छोट्या शाळा सध्या गजबजू लागल्या आहेत. शाळेबाहेरील शाळा या उपक्रमाने शिक्षक होण्याची इच्छा पूर्ण झाली. माझ्या शिक्षणाचा उपयोग ज्ञानादानासाठी झाला. शिवाय फावल्या वेळेचा सदुपयोग झाल्याने खूप समाधानी आहे. 
- रसिका मेस्त्री, शिक्षण मित्र, ओटवणे 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले पाच महिने शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून "शाळे बाहेरील शाळा' उपक्रमासाठी स्थानिक ग्रामपंचायत, व्यवस्थापन समिती, गावातील उच्चशिक्षित तरुण, तरुणी, पालकांचे विशेष योगदान लाभत आहे. सर्व शिक्षणमित्र सेवाभावी वृत्तीने कार्य करत असल्याने हा उपक्रम यशस्वी होत आहे. 
- अरुण होडावडेकर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, ओटवणे शाळा क्रमांक 1 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Otavane fills the children's school here