
ओरोस (सिंधुदुर्ग) - सावंतवाडी येथील मोती तलावात पाणमांजरांचे आगमन हे पर्यावरणीय समृद्धीचे निदर्शक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षित अशा या प्राण्याला संरक्षण देण्याचे काम सावंतवाडी पालिकेने करावे. पाणमांजरांचे अस्तित्व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकेल. त्या दृष्टीने पाणमांजरांच्या आगमनाकडे पाहावे, अशी मागणी "घुंगुरकाठी सिंधुदुर्ग' या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात लळीत यांनी म्हटले आहे, की सावंतवाडीच्या मोती तलावात पाणमांजर (उद किंवा ऑटर) येणे खूप आनंददायी आहे. स्वभावाने लाजराबुजरा असणाऱ्या या प्राण्याचे मुख्य खाद्य मासे आहे. अवैध शिकारीमुळे या प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आल्याने त्याला कायद्याचे संरक्षण आहे. हा प्राणी अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. हा प्राणी निरुपद्रवी असून माणसाला त्याचा धोका नसतो.
बांगलादेशमधील मच्छीमार पाणमांजरांना प्रशिक्षित करून माशांना जाळ्यांकडे वळविण्यासाठी उपयोग करतात, याचेही संदर्भ आहेत. मोती तलावात नौकाविहार, शिकारा, स्कुबा डायव्हिंग अशा प्रकारच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न पालिकेने याआधीही केले आहेत. याचे फलित आपणा सर्वांसमोर आहे. पाणमांजराचा पाण्यातील वावर, मासे पकडणे, पाण्यात सुळकांड्या मारणे मनोवेधक असते.
पर्यटकांचे आकर्षण ठरू शकणाऱ्या या पाणमांजरांचे संवर्धन करून सावंतवाडीच्या पर्यटनाला व जैवविविधतेला नवा आयाम देण्याचे काम पालिकेने करावे, असे आवाहनही श्री. लळीत यांनी केले आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब हे उत्साही व नवीन उपक्रम राबविणारे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी पाणमांजरांच्या आगमनाकडे एक संधी म्हणून पाहावे, असे सतीश लळीत त्यांनी म्हटले आहे.
जिल्हा जैवविविधतेने समृद्ध
सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधतेने अतिशय समृद्ध असून याचा वापर पर्यटन वाढण्यासाठी करणे शक्य आहे. कृत्रिम उपाय योजण्यापेक्षा निसर्गाने भरभरून दिलेल्या जैववैविध्याचा वापर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केला पाहिजे. वन्यप्राणी - मानव संघर्ष होऊ न देता परस्पर साहचर्य ठेवून पर्यावरणानुकूल पर्यटन प्रकल्प राबवले तर निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वासही श्री. लळीत यांनी व्यक्त केला आहे.
पाणमांजरांचे संरक्षण करणार- नगराध्यक्ष
येथील शहराचे सौंदर्यात भर घालणाऱ्या ऐतिहासिक मोती तलावात पाणमांजरे दाखल झाली आहेत. पर्यावरणदृष्ट्या ते महत्त्वाचे असल्याने त्यांचे संरक्षण करण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. पाणमाजरांचा कोणालाही त्रास झालेला नाही तसेच तलावात त्यांचे वास्तव्य असल्यास पर्यावरणदृष्ट्या पुरक आहे, असे परब म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.