
पाली, ता. 26 (वार्ताहर) संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज असल्यामुळे त्याविषयी किमान प्राथमिक माहिती तरी सर्व भारतीयांना असणे आवश्यक आहे. मात्र ती आपल्या 90 टक्के पेक्षा जास्त भारतीयांना अपेक्षेप्रमाणे माहित नाही.
यासाठी अनेक कारणे असली तरी संविधानामध्ये असलेली कायदेशीर भाषा ही अनेकांना न समजण्याजोगी आहे. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील नुरखॉं पठाण हे प्राथमिक शिक्षक मागील सहा वर्षांपासून विविध माध्यमांद्वारे संविधान जनजागृतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
खास करून सोशल मिडीया व प्रत्यक्ष मार्गदर्शनाच्या माध्यमातून वर्षाचे ३६५ दिवस हा अवलिया कार्यरत आहे. 'संविधान म्हणजे काय?' येथून ते संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदाचे साध्या सोप्या भाषेत विश्लेषण करणाऱ्या 'आपले संविधान..राज्यपद्धतीच नव्हे, तर जीवनपद्धती' ह्या दोन मिनिटांच्या पोस्ट च्या माध्यमातून ते हजारो लोकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले असून संविधानाबद्दल लोकांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण जनजागृती करत आहेत.