सुपारीला दर; पण रोगाचा फटका

Outbreak of disease on betel nut crop
Outbreak of disease on betel nut crop

बांदा (सिंधुदुर्ग) - अतिवृष्टी आणि अवेळी पावसाचा भातशेती बरोबरच सर्वाधिक फटका हा सुपारी बागायतदारांना बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यातील 70 टक्केहून अधिक सुपारीला गळ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पन्न घटले तरी दर मात्र वाढल्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. 
 

सुपारीची व्याप्ती 
जिल्ह्याच्या कृषी अर्थकारणात 30 टक्के वाटा हा सुपारीचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत एकूण उत्पादित कृषीमालाच्या 5 टक्के उत्पन्न हे सुपारी उत्पादनातून मिळते. यावरून सुपारी उत्पन्न हे शेतकऱ्यांना किती आर्थिक फायदा मिळवून देते हे स्पष्ट होते. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या सुपारीला मध्यप्रदेश, मेंगलोर, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पाकिस्तान, बांगलादेश येथे मोठी मागणी आहे. सुपारीचा मुख्यत्वे वापर हा खाण्यासाठी होतो. सुगंधी सुपारी बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून या सुपारीचा वापर केला जातो. कोकणातील नैसर्गिक वातावरण व मुबलक पाण्याच्या साठ्यामुळे येथील सुपारीला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. 

सिंधुदुर्गातील लागवड 
नारळ, काजू या पारंपरिक पिकांसह शेतकऱ्यांनी सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सावंतवाडी व दोडामार्ग हे दोन्ही तालुके नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांनी बारमाही समृद्ध असल्याने शेतकऱ्यांनी मेहनतीने सुपारी बागा फुलविल्या आहेत. सावंतवाडी तालुक्‍यातील तांबोळी, असनिये, कोनशी, माडखोल, ओटवणे, डेगवे, डिंगणे, गाळेल, वाफोली, झोळंबे व दोडामार्ग तालुक्‍यातील बहुतांश गावात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुपारीला दर असल्याने शेतकऱ्यांनी गावठी सुपारीची लागवड केली आहे. या सुपारीचे उत्पादन लागवड केल्यानंतर 6 ते 7 वर्षानंतर मिळण्यास सुरुवात होते. या झाडांची उंची देखील सर्वाधिक असते. कमी वेळेत व भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता "श्रीवर्धन रोठा', "मोहित नगर', "विठ्ठल', "मंगल', "सुमंगल', "शिवमंगल' या सुपारींच्या लागवडीस सुरुवात केली आहे. 

यंदा 70 टक्के गळ 
यावर्षी अतिवृष्टीचा फटका या पिकाला बसला आहे. 70 टक्केहून अधिक फळाची गळ झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. सावंतवाडी तालुक्‍यात 350 हेक्‍टर क्षेत्रात तर दोडामार्ग तालुक्‍यात 300 हेक्‍टर क्षेत्रात सुपारीची लागवड करण्यात आली आहे. यात गळ झाल्याचे प्रमाण खूपच आहे. 

बिघडलेले गणित 
सुपारीच्या झाडाला डिसेंबरमध्ये फळधारणा होते. जून, जुलैपर्यंत सुपारी ही अर्धी कच्ची तयार होते. पाऊस सुरू व्हायच्या आधी पहिली औषध फवारणी करण्यात येते. त्यानंतर जुलैत होते. फळ काढणी ऑक्‍टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीत होते. एका फवारणीचा एक दिवसाचा खर्च हा 4 ते 6 हजार रुपये येतो. झाडांची उंची, कामगारांची कमतरता यामुळे फवारणीचा खर्च हा शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. फवारणी न केल्यास पावसाच्या पाण्याने फळावर बुरशी जमा होते. त्यामुळे फवारणी ही अत्यावश्‍यक असते. 

दर वाढला पण... 
सुपारी विक्रीसाठी बांदा व गोवा बाजारपेठ मोठी आहे. बांदा बाजारपेठेत गतवर्षी 50 हजार किलो सुपारी विक्रीसाठी आली. गोवा बागायतदार संघाचा दर जास्त असल्याने गतवर्षी सुमारे 1 लाख 50 हजार किलो सुपारी गोवा बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात आली. यामध्ये ओल्या सुपारीला सर्वाधिक किंमत मिळते. गोवा फळबागायतदार संघाकडून सुपारीचा दर निश्‍चित केला जातो. यावर्षी सुपारीचा सध्याचा दर प्रतिकिलो 350 रुपये आहे. गळ सुपारीचा दर प्रतिकिलो 160 ते 180 रुपये आहे. गतवर्षी सुपारीचा दर प्रतिकिलो सुमारे 270 रुपये होता. यावर्षी गळ मोठ्या प्रमाणात असल्याने दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले; मात्र उत्पन्नच हातात नसल्याने दर वाढूनही शेतकरी नुकसानातच आहेत. 

अनुदानापासून वंचित 
सुपारीचे शासन दप्तरी फळपीकमध्ये वर्गीकरण होत नसल्याने सुपारी शासकीय नुकसान भरपाईपासून वंचित आहे. आंबा, काजू, भात याप्रमाणे सुपारीला भरपाईचे निकष देण्यात आले नाहीत. सुपारी पिकाचे नशाजन्य पदार्थांमध्ये वर्गीकरण होते. त्यामुळे शासन या पिकासाठी स्वतंत्रअनुदान देत नाही. 

संशोधनापासूनही दूर 
तळकोकणातील सुपारी उत्पादन हे महत्वाचे पीक आहे. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यात सुपारीच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र कोकण कृषी विद्यापिठ या पिकाकडे फारसे गांर्भीयाने पाहत नाही. त्यांनी श्रीवर्धन आणि मंगला या जाती विकसित केल्या आहेत; पण त्याची व्यावहारिकता पाहता स्थानिक लागवड फारच अल्प आहे. सुपारीवर फवारणी ही शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. फवारणी खर्च टाळण्यासाठी झाडाच्या बुंध्यात वापरण्यायोग्य औषधांचे संशोधन होणे गरजेचे आहे. यामुळे फवारणीचा धोका कमी होईल व खर्चात कपात होईल; पण तसे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. 

कर्नाटकात अपरिपक्व सुपारी काढून ती उकळली जाते. त्यानंतर त्याचा रस काढून त्यात रंग मिश्रित करून प्रक्रिया केली जाते. या रसाचा वापर कपड्याच्या पेंटिंगसाठी करण्यात येतो. याला मोठी मागणी असून शेतकऱ्यांना कमी कालावधीत आर्थिक फायदा होतो. सुपारी नुकसानीचे आतापर्यंत पंचनामे झाले, मात्र अद्याप एकही रुपयांची भरपाई नाही. कोकणातही शासनाने अशी सुपारी खरेदी करून रंगासाठी वापर करावा. 
- अभिलाष देसाई, शेतकरी तांबोळी (ता. सावंतवाडी) 

अतिवृष्टीमुळे सुपारीचे मोठे नुकसान झाले आहे. बांदा मंडलातील 36 गावांत पंचनामे सुरू आहेत. यासाठी अजून एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतरच एकूण नुकसानीचा आकडा समजेल. शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांचे 30 टक्केहून अधिक नुकसान झाले, त्यांना प्राधान्याने भरपाई दिली आहे. निधी उपलब्ध होईल त्यानुसार भरपाई मिळेल. 
- रूपाली पापडे, मंडल कृषी अधिकारी, बांदा. 

यावर्षी अतिवृष्टीमुळे सुपारी उत्पादनाला फटका बसला आहे. दरवर्षी गोवा फळबागायतदार संघाकडून दर निश्‍चित करण्यात येतो. संपूर्ण सुपारी खरेदी करून गोव्यातून मेंगलोरला पाठविण्यात येते. तेथून संपूर्ण भारत व परदेशात सुपारी निर्यात होते. यावर्षी सुपारीला निसर्गाचा फटका बसल्याने सुपारी उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. 
- संदेश पावसकर, सुपारी व्यापारी, बांदा 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com