
राजापूर ( रत्नागिरी ) - सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या रिफायनरी प्रकल्पातून लाखो लोकांना रोजगार मिळणार अन् कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प स्थानिकांना हवा आहे. प्रकल्प समर्थन वाढू लागले आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींनी प्रकल्प समर्थकांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून द्यावी. अन्यथा प्रकल्प समर्थकांचा उद्रेक होवून ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आणि सचिव अविनाश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी डोंगरतिठा येथे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात केलेल्या निदर्शनाचा निषेध करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी आमदार साळवी यांनी लोकांची मागणी असल्यास शासन रिफायनरी प्रकल्प करण्याचा विचार करेल, असा विश्वास प्रतिक्रियेमध्ये व्यक्त केला होता. त्याचे पडसाद प्रकल्प समर्थक आणि विरोधकांमध्ये उमटू लागले आहेत. प्रकल्प विरोधकांनी गुरुवारी (ता. 24) सायंकाळी आमदार साळवी यांच्या विरोधात डोंगरतिठा येथे निदर्शने केली. त्याचा कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या पत्रकार परिषदेत निषेध केला.
संतोष सातोसे, प्रल्हाद तावडे, अरविंद लांजेकर, सुहास मराठे, अद्वैत अभ्यंकर आदी उपस्थित होते. रिफायनरी प्रकल्पातून राजापूर तालुक्याचे नव्हे, तर जिल्ह्याचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे आमदार साळवी यांच्या रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या भूमिकेचे स्वागतच. प्रकल्प विरोधकांची हिडीस निदर्शने म्हणजे भवितव्याची प्रेतयात्रा आहे.
लोकप्रतिनिधींकडून प्रकल्प विरोधकांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून दिली जाते. मग प्रकल्पसमर्थकांना का भेटू दिली जात नाही. शासनाने रिफायरी प्रकल्पग्रस्त गावातील जमिनींचा मोबदला जाहीर करावा मग कळेल लोकांना प्रकल्प हवा की नको. राजापूरमध्ये होतो म्हणून रिफायनरी प्रकल्प विनाशकारी ठरत असेल तर, रायगडमध्ये विनाशकारी ठरणार नाही का, असा सवालही त्यांनी केला.
मनाई असताना डोंगरतिठा येथे जमाव
ज्यांचे रिफायनरी प्रकल्पामुळे काही जात नाही त्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या गावातील लोकांकडून प्रकल्पविरोधाची नौटंकी केली जात असल्याच्या उल्लेख करीत परंढरीनाथ आंबेरकर यांनी खिल्ली उडविली. जिल्ह्यामध्ये विविध कारणांमुळे जमाव करण्यास मनाई असताना डोंगरतिठा येथे जमाव करून आमदार राजन साळवींच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांवर पोलिसांसह प्रशासनाने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.