दिलासादायी! डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या पाचशेच्यावर, कोणता हा जिल्हा?

विनोद दळवी
Monday, 24 August 2020

जिल्ह्यात गणेशाचे आगमन झाले त्याच दिवशी काल (ता. 22) सर्वाधिक 130 कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्हा हादरला होता.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज आणखी 15 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या 500 च्या वर गेली असून 509 एवढी झाली आहे. आणखी पाच व्यक्तींचे अहवाल बाधित आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित संख्या 937 झाली आहे. परिणामी 413 रुग्ण जिल्ह्यात सक्रिय राहिले आहेत. 

जिल्ह्यात गणेशाचे आगमन झाले त्याच दिवशी काल (ता. 22) सर्वाधिक 130 कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्हा हादरला होता. परिणामी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकदम 100 पेक्षा जास्तने वाढत ती 932 वर पोहोचली होती; मात्र आज जिल्ह्याला दिलासा मिळाला. आज प्राप्त झालेल्या 236 अहवालांतील केवळ 5 बाधित आले, तर 231 अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्याची बाधित संख्या 937 झाली आहे. सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पहा - Video - कोल्हापुरात दख्खनचा राजा जोतिबा मालिकेच्या सेटचे भूमीपूजन ; चित्रनगरीत पहिल्यांदाच उभारणार भव्य सेट, कोल्हापूरची चित्रपंढरी ही ओळख नव्याने निर्माण होणार

जिल्हा कोरोना चाचणी केंद्राला नव्याने 220 कोरोना नमुने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 11 हजार 495 झाली आहे. यांतील 11 हजार 267 नमुने अहवाल प्राप्त झाले आहेत, तर 233 अहवाल प्रतीक्षेत राहिले आहेत. नव्याने प्राप्त अहवालात आणखी 231 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे निगेटिव्ह अहवालांची संख्या 10 हजार 325 झाली आहे.

नव्याने 5 अहवाल बाधित आल्याने आतापर्यंत 937 अहवाल बाधित झाले आहेत. आज आणखी 15 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 509 व्यक्ती ठणठणीत होऊन घरी परतल्या आहेत, तर आतापर्यंत 15 व्यक्तींचे निधन झाले आहे. यात जिल्ह्यातील 14 आणि वास्को गोवा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. परिणामी 413 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. या सर्व रुग्णांवर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात तयार केलेल्या संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 803 व्यक्ती कमी झाल्या आहेत. त्यामुळे संस्थात्मक क्‍वारंटाईन व्यक्तींची संख्या 20 हजार 34 झाली आहे. यांतील गाव पातळीवरील संस्थात्मक क्‍वारंटाईनमधील 857 व्यक्ती कमी झाल्या आहेत. त्यामुळे येथील दाखल व्यक्तींची संख्या 15 हजार 837 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये 24 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 4 हजार 197 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात नव्याने 401 व्यक्ती दाखल झाल्याने जिल्ह्यात 2 मे पासून दाखल होणाऱ्या व्यक्तींची संख्या 2 लाख 1 हजार 108 झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 104 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत. 

जिल्ह्यात नवीन कंटेन्मेंट झोन 
कणकवली तालुक्‍यातील वरवडे-मुस्लीमवाडी येथील खोत महंमद अहमद शेख मुरादअली घर, खारेपाटण-बंदरगाव येथील हसनमिया अबुबकर सारंग घर, कलमठ- लांजेवाडी येथील विवेक महादेव चिंदरकर घर, जानवली-वाकाडवाडी येथील आदिती संजीव फाटक घर, देवगड तालुक्‍यातील जामसंडे-मकरवाडी येथील भालचंद्र राजहंस घाडी घर, शहरामधील खालची बाजारपेठ येथील दीपक नारायण बिडये घर, शहरामधील ब्राह्मणदेव मंदिर येथील इंद्रनिल नागेश बांदेकर घर, तांबळडेग येथील नारायण रोहिदास राऊळ व विष्णू रोहिदास राऊळ यांचे घर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over five hundred discharged patients in konkan sindhudurg