
कोकण रेल मार्गावरील रोहा ते रत्नागिरी येथील विदयुतकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गांवर रत्नागिरी व रोहा या दरम्यान ओव्हरहेड वायर विद्युत भारित करण्यात येणार आहे. तरी रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कोकण रेल मार्गावरील रोहा ते रत्नागिरी येथील विदयुतकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे. या मार्गावरील विद्युत जोडणीचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे विजेचा प्रवाह सोडून चाचणी करण्यासाठी रेल प्रशासन कार्यवाही करत आहे. ही चाचणी मंगळवारपासून सुरु झाली आहे. त्यामुळे कोकण रेल मार्गाजवळ कोणत्याही ठिकाणी वायर अथवा खांब तसेच कोणत्याही वस्तूला स्पर्श टाळावा. तसेच, लेव्हल क्रॉसिंग गेट पार करताना ट्रॅक वरील तारेला स्पर्श करेल अशी कोणतीही गोष्ट - जसे की बांबू, शिडी, आंब्याचा घळ- तारेच्या आसपास पोहोचणार नाही अशी काळजी घ्या असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
रोहा ते रत्नागिरी मार्गावर ही विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे तरी रेल्वे मार्गानजीकच्या नागरिकांनी सतर्क रहावे कारण अशा तारा ना स्पर्श करणे प्राणघातक ठरू शकते अशी सूचना देण्यात आली आहे. दरम्यान विद्युत प्रवाह चाचणी यशस्वी झाल्यानंतर या मार्गांवर लोकल चालवून पाहण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते रत्नागिरी आणि पुढील टप्प्यात रत्नागिरी ते मडगांव असे विद्युतीकरण होणार आहे. सर्व चाचण्या केल्या नंतर जून पूर्वी गाड्या धावतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.