पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीला एक कोटीचा फटका 

राजेश कळंबटे
Sunday, 18 October 2020

जिल्ह्यात 1700 हेक्‍टर बाधित झाले असून पूर्ण पंचनामे झाल्यानंतर नुकसान तिप्पट वाढण्याची भीती आहे.

रत्नागिरी : मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार 1700 हेक्‍टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. शासकीय अंदाजानुसार एक कोटी 15 लाखांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यावेळी हा आकडा तिप्पट होईल, अशी शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे. 

परतीच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी ऑनलाईन कॉन्फरन्सद्वारे घेतला. या वेळी कोकणातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. 

पावसातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात 1700 हेक्‍टर भातशेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्‍यात नोंदले जाण्याची शक्‍यता आहे. रत्नागिरी तालुक्‍यात 300 हेक्‍टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यावेळी यामध्ये वाढ होऊ शकते. 

पुराच्या पाण्यात वाहून गेलेली शेती, कापून भिजलेले भात, भिजलेला पेंढा आणि पावसाने आडवं होऊन कोंब येण्याची प्रक्रिया अशा चारप्रकारे नुकसानाचे सर्वेक्षण केले जात आहे. चौथ्या दिवशी जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णतः ओसरला आहे. शनिवारी (ता. 17) सकाळी कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तीन दिवसांनंतरही जिल्ह्यातील नदीकिनारी भागात असलेल्या शेतीत अजूनही चार ते पाच फूट पाणी साचलेले आहे. कातळावर कापून ठेवलेली शेती पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. उशिरा तयार झालेल्या गरव्या शेतीवर परिणाम होणार असून, त्यात दाणेच शिल्लक राहणार नाहीत, अशी स्थिती जिल्ह्यात आहे. कडकडीत ऊन पडल्यामुळे काही शेतकऱ्यांनी भिजलेले भात सुकवून झोडण्यास सुरवात केली आहे; गावखडी येथे काही ठिकाणी अजूनही शेतात 3 ते 4 फूट पाणी असल्यामुळे ते कापणे अशक्‍य झाले आहे. 

         नजर अंदाजित जिल्हानिहाय नुकसान हेक्टरमध्ये

  • ठाणे - 9 हजार 465 
  • पालघर - 1 हजार 550 
  • सिंदुधुर्ग  - 6 हजार 
  • रत्नागिरी - 1 हजार 600 
  • रायगड  - 16 हजार  

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paddy cultivation in Ratnagiri district hit by Rs 1 crore due to rain