शिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी!

padma shri award 2020 Parshuram Gangawane Padmashri sindhudurg
padma shri award 2020 Parshuram Gangawane Padmashri sindhudurg

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक, राजकारणी आपली एक अनोखी ओळख निर्माण करून देशासमोर एक आदर्श निर्माण करत आसतात. याच तांबड्या मातीत गावोगावी कोणीतरी कलाकार सापडतोच. दशावतार ही लोककला, जशी कोकणवासीयांची खासियत आहे, तशीच लोप पावत चाललेली अजून एक कला या मातीत आहे आणि हीच कला जोपासण्याचे काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्राचा नुकताच सरकारने पद्मश्री सारखा मानाचा पुरस्कार देऊन करून गौरव केला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ही बाब अभिमानास्पद असून, त्यांनी लोककलेसाठी घेतलेल्या कष्टांचा हा सन्मान करण्यात आला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रभोदन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

काय आहे परशुराम गंगावणे यांचे योगदान? 

पूर्वीच्या काळात मनोरंजनाची कोणत्याही प्रकारची साधने उपलब्ध नव्हती. याच काळाच तळकोकणात एक कला बहरत होती. लोकांना हीच कला मनोरंजनाची एकमेव साधन म्हणून उपल्बध होती. या कलेचा प्रणेता असलेल्या ठाकर लोककलेची संस्कृती तेवढीच अनोखी आहे. आपली पारंपरिक कला जोपासताना चारशे वर्षांपूर्वीच्या बाहुल्याच नव्हे तर चित्रकथी, आणि ऐतिहासिक साहित्याचा ठेवा  हे ठाकर कुटुंबीय जपत आहेत.  

बदलत्या काळानुसार माध्यमात मोठे बदल होत गेले तसे कळसूत्रीकडे लोकांनी पाठ फिरविली. परंतु, कलेसाठीच वाहून घेतलेल्या ठाकर कुटुंबातील ६५ वर्षीय परशराम विश्राम गंगावणे यांनी कुडाळजवळच्या पिंगुळी या गावात गुरांच्या गोठ्यामधे आर्ट गॅलरी म्युझियम बनवले. ३ मे २००६ रोजी गंगावणे यांनी हे म्युझियम उभारले. गेल्या ९ वर्षापूर्वी विश्राम ठाकर आदिवासी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्ट नावाने नोंदणी करून त्यात पपेट, चित्रकथी, कळसूत्रीची अगदी शिस्तबद्ध मांडणी केलेली आहे.

डोळ्याचे पारणे फेडणारे म्युझियम
 जन्मत: वडील विश्राम, आजोबा आत्माराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदिवासी कलेचा वारसा पुढे चालू राहावा, यासाठी झटणाऱ्या परशुराम गंगावणेंनी कलेसाठी आयुष्य वाहून घेतले आहे. 

या म्युझियमच्या आजूबाजूच्या माड, पोफळींच्या झाडांच्या खोडावरसुद्धा राजे महाराजे द्वारपाल स्वागत करणाऱ्या पुरातन स्त्रियांची चित्रे विविध रंगात रंगविलेली आहेत. अंगणात प्रवेश करायचे प्रवेशद्वार, कमानसुद्धा बांबूच्या डहाळ्यांपासून तयार करून त्यावर हरण, फुलेसारखी चित्र तर प्रवेशद्वाराच्या एका बाजूस हातात ढोलकी तर सोबतीला नंदीबैल असे सिमेंट प्लास्टरपासून बनवलेली प्रतिकृती त्यासमोरील छोट्याशा झोपडीत (खोपीत) घरगडी त्याची शेतात राबणारी कारभारीण त्या सभोवर जाते. 

शेवगा, रवळी, बुडकुले, डहाळी, कांबळे, टोपली (हडगी), घिरट, जू, नांगर, मासेमारी करायची शेंडी, बांबू-काठयांपासून बनवलेला बाक, सोरकूल, शिंका, एवढंच नव्हे तर रॉकेल कंदील, शेणाने सारवलेल्या भिंती त्यावर शेडने काढलेली भिंतीवरील ठिपका फुले, भिंतीवर रेखाटलेला नागोबा, झोपडीचे कौलारू छप्पर मातीच्या भिंती लक्ष वेधून घेतात. आपली जुनी असलेली लोककला जपण्यासाठी गंगावणे संपूर्ण देश फिरल्याचे गंगवाने यांनी ईसकाळसोबत बोलताना सांगितले. 

गंगावणे सांगतात, बडोदा, गुजरात, मुंबई, पुणे, औरंगाबाद, चेन्नई, मध्य प्रदेश, कुरूक्षेत्र, दिल्ली, बेंगलोर, म्हैसूर, राजस्थान, कलकत्ता येथून जाऊन पपेट शो केले. माझी एकनाथ आणि चेतन ही दोन्ही मुले शोसाठी गाणे गाऊन तबला वाजवून बाहुल्या नाचवून  मदत करतात. 


कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्यशाळासुद्धा पिंगुळीला आयोजित केल्या जातात. पुणे आणि मुंबईलासुद्धा खास खेळ आणि कार्यशाळा घेतल्या जातात. खास आदिवासी उपकरणे, वाद्ये, पोशाख, हिरोबा, चित्रकथीसाठी वापरली जाणारी चित्रे आदींचे सुंदर प्रदर्शन पिंगुळीला ठाकर आदिवासी कला केंद्रात मांडलेले आहे. फक्त दोन रूपये एवढे शुल्क देऊन हे प्रदर्शन पाहता येते. त्याचबरोबर इथेच कळसूत्री बाहुल्यांचे खेळसुद्धा दाखवले जातात. 

''माझ्या याच ५० वर्षाच्या श्रमाची दखल घेऊन शासनाने मला पुरस्कार देऊन गौरवले असल्याच्या भावना गंगावने सांगतात. विविध सांस्कृतिक समित्यांवर कला सल्लागार म्हणून माझी नेमणूक केलेली आहे. हे अत्यंत जिव्हाळ्याने जोपासलेले प्रदर्शन आणि टिकवून धरलेली ही चित्रकथीची कला मुद्दाम खास वेळ काढून भेट देण्याजोगी आहे. कुडाळपासून तीन किलोमीटरवर मुख्य हमरस्त्याच्या बाजूलाच असलेले हे प्रदर्शन प्रत्येकाने पाहावे असेच आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग किंवा गोव्याला जाताना अगदी आवर्जून पिंगुळीला थांबावे आणि कलेचा एक मोठा खजिना मनसोक्त पाहून घ्यावा, असे आवाहनही गंगावणे करतात. 


कसा असतो कळसुत्री भावल्यांचा खेळ?

कळसुत्री भावल्यांचा खेळ कसा केला जातो. याबद्दल माहिती देताना परशुराम गंगावणे सांगतात, स्त्री-भ्रूण हत्यासारखे विविध विषय घेऊनही प्रबोधन केले जाते. या खेळात तीस बाहुल्यांचा समावेश असतो. अशा प्रकारे कळसूत्री बाहुल्यांमार्फत जवळजवळ १०० प्रयोग केले आहेत. कोलकाता, मुंबई आणि बाहेर अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. या चित्रकथीचा प्रभाव राजस्थान, कर्नाटक, आंध्र येथील कला प्रकारांवर झाला. आमच्याकडे १० पोथ्या सध्या आहेत. त्यातील काही आताच्या आणि काही ३०० ते ३५० वर्षापूर्वीच्या आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांकडून राजाश्रय
मराठ्यांच्या राजवटीत ठाकर आदिवासी कलेकडे शिवरायांचे लक्ष गेले आणि अर्थाने राजाश्रय लाभला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठाकर बांधवांना दरबारात बोलावून सादरीकरणासाठी प्रत्येक कुटुंबीयांना काही गावे नेमून दिली होती. त्यावेळी मळेवाडी, गुळडुवे, आरोंदा, तळवडे ही गावे परशुराम गंगावणेच्या पूर्वजांना देण्यात आली होती. चित्रकथीचे सादरीकरण करण्यासाठी जायचे आणि अनेक मुलखात संचार करताना शत्रू पक्षाच्या गोटातील अनेक गुपिते शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवायची कामे ठाकर समाजीतल मंडळी करत असत. या त्यांच्या गुप्तहेरगिरीसाठी ठाकर आदिवासींना शिवाजी महाराजांनी जमीनी इनाम म्हणून दिल्या होत्या. त्याकाळी कलाकारांच्या अंगावर व्यवस्थित कपडेही नसत. पण पानाच्या रसापासून झाडांच्या फुलांपासून मनमोहक रंग तयार करत चित्रे रेखाटण्यासाठी त्यांची धडपड असायची. या मनस्वी कलावंताच्या कलेची दखल घेत असतानाच हाताबोटांची कसरत करून कौशल्याने पपेट (बाहुल्या) नाचवण्याचे त्यांचे कौशल्य पाहून चक्क शिवाजीरा जेसुद्धा भारावून गेले होते. त्यांच्या पश्चात या कलेला संभाजी राजेंनीदेखील हातभार लावला. त्यांनी प्रथम आदिवासींना सुव्यवस्थित कपडे घालायला दिले. राजांनी कठपुतळी, कळसूत्री, पपेटचे सादरीकरण करण्यासाठी काही ठरावीक मंदिरात जागा उपलब्ध करून दिली. आणि रोजी-रोटीचा प्रश्नही सोडविला. त्यावेळीपासून गेली ५०० वर्षे ही परंपरा आजमितीपर्यंत अविरत चालू आहे.

संशोधनाचा विषय

या कलेतून होत असलेल्या जनजागृतीचे संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासू सिंधुदुर्गला येत असतात. आतापर्यंत फ्रान्सचे इयॉन लींच, लंडनचे टॉम, सायमन, ऑस्ट्रेलियाची जेनीफर, अ‍ॅलेक्समोरा, कॅम्ब्रीज युकेची उमा फोस्टीस, जर्मनी-तुवाइलायन कॅरीयसवायन, डॉ. सुयी लारनिंग, हॉलंड-मरिना अशा सुप्रसिद्ध विदेशी फोटोग्राफरसह किम मॅक्सीको येथील डायगो दिहानीने तर या कला पॅरिस वेरनिक पोल्स आंगणमध्ये पाच दिवस थांबून ठाकर कलेबद्दल परिपूर्ण माहिती घेतली. सध्या तो या दुर्मीळ कलेवर संशोधन करत आहे.


''तब्बल तीनशे वर्षांपासून आमचे ठाकर कुटुंबीय ही कला जपत आहेत आणि मी गेल्या पन्नास वर्षांपासून ही कला जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या याच प्रयत्नाची दखल घेऊन मला हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचे आभार मानतो. कोणत्याही अपेक्षेशिवाय मी कलेची सेवा करत होतो. त्यामुळेच हा पुरस्कार मला मिळाला आहे असे मला वाटते.''
 -परशुराम विश्राम गंगावणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com