कुंचला देतोय जगण्याला नवा आयाम

प्रभाकर धुरी
Wednesday, 21 October 2020

तिची चित्रे हृदयस्पर्शी तर आहेतच; पण आपल्या जगण्याला नवा आयाम देऊ शकतील, असे सामाजिक संदेश देतील, अशीही आहेत. 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - सगळं जग जेव्हा कोरोना, लॉकडाउन आणि रूग्णालयात मृत्यू पावणाऱ्या अथवा सुखरूपपणे घरी परतणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीत दंग होतं तेव्हा एक शाळकरी मुलगी आपल्या रंग रेषांच्या विश्‍वात व्यस्त होती. तिच्या अंगभूत कलांचा आविष्कार सुरेख चित्राच्या माध्यमातून निर्जीव कागदावर जिवंत होत होता. तिची चित्रे हृदयस्पर्शी तर आहेतच; पण आपल्या जगण्याला नवा आयाम देऊ शकतील, असे सामाजिक संदेश देतील, अशीही आहेत. 

खेळण्या-बागडण्याच्या वयात कुंचला हाती घेऊन भोवताल आणि माणसाचे जगणे चित्रात रेखाटणाऱ्या त्या मुलीचे नाव आहे मृदुला ऊर्फ दुर्वा दीपक देसाई. दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या आठवीची ती विद्यार्थिनी. तालुक्‍यातील कोलझर तिचे गाव. चौथीपर्यंतचे शिक्षण कोलझर प्राथमिक शाळेत तर पाचवीपासून दोडामार्ग हायस्कूलमध्ये शिक्षण. तिची आई गृहिणी असली तरी त्यांनी आणि वडिलांनी काही काळ सावंतवाडीतील बांदेकर फाईन आर्ट कला विद्यालयात नोकरी केली.

शिवाय तिचे चुलत काका मुंबईत कला शिक्षक. त्यामुळे लहानापासून तिला कलेची आवड. क्राफ्ट, रांगोळी आणि चित्रकला हे तिचे आवडते विषय. आई, वडील, काका अनंत देसाई आणि हायस्कूलचे कला शिक्षक योगेश गावित तिचे मार्गदर्शक. तिच्या चित्रात वेगवेगळे सण, अनेक थोर व्यक्तींचे, देव देवतांचे फोटो असतात. शिवाय अनेक प्रासंगिक आणि सामाजिक विषयही असतात. स्वच्छतेचा संदेशही ती चित्रांतून देते. कोरोना काळात कोणती दक्षता घ्यावी तेही ती चित्रांच्या माध्यमातून सांगते. भोवतालचा निसर्ग, पशुपक्षी, मानवी चेहरे ती लीलया रेखाटते. 

स्पर्धा आनंदाची पर्वणीच 
"सकाळ'ची चित्रकला स्पर्धा तिच्यासाठी आनंदाची पर्वणी असते. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ती 70-75 किलोमीटर अंतर पार करते. इतकी चित्रकला तिची आवडती आहे. तिचे वडील सध्या व्यसनमुक्ती केंद्र चालवतात. ते प्रकल्पाधिकारी आहेत. आपल्या मुलीने जोपासलेला छंद तिचे करिअर बनावे असे त्यांना वाटते. त्यासाठी लागेल ते करण्याची त्यांची आणि त्यांच्या पत्नीचीही तयारी आहे. मृदुलाचा व्यासंग पाहता ती त्यांची इच्छा पूर्ण करेल, असा विश्‍वास वाटतो.

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Painting of a little girl from Sindhudurg district