Pali News : मानेला दोरी अडकलेल्या त्या जखमी वानराने घेतला मोकळा श्वास

पाली शहरात एक मादी वानर गळ्याला प्लास्टिक दोरीचा फास लागून जखमी अवस्थेत फिरत होते.
Monkey Rescue Operation
Monkey Rescue Operationsakal

पाली - पाली शहरात एक मादी वानर गळ्याला प्लास्टिक दोरीचा फास लागून जखमी अवस्थेत फिरत होते. सोमवारी (ता.16) रात्री पुणे येथिल रेस्क्यू टीम, स्थानिक तरुण व वनविभागाच्या सात तासाच्या अथक प्रयत्नांनी या वानराची दोरी काढून औषधोपचार केले. पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले. यावेळी एका जखमी अजगरावर देखील उपचार करण्यात आले.

पाली शहरात माकडे वानरांचा मुक्त संचार वाढला आहे. अनेकदा ही वानरे व माकडे शॉक लागून, खाली पडून किंवा वाहनांचा धक्का लागून जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. मात्र हे वानर नशीबवान ठरले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पाली वनविभागाचे कर्मचारी नामदेव मुंडे यांनी वन्यजीव रक्षक अमित निंबाळकर यांना फोन करून एक माकड जखमी आहे त्याला रेसक्यू करायचं आहे असे सांगितले. त्यांच्यासोबत वन्यजीव रक्षक शंतनू लिमये व बाकीचे कर्मचारी होते. पण अवघड ठिकाणी असल्यामुळे आणि जखमी असल्यामुळे व्यवस्थित पकडणे गरजेचे होते. फोन येताच अमित निंबाळकर व मनिष खोडागळे जागेवर पोहोचले.

या मादी वानराच्या गळ्याला प्लास्टिक दोरीचा फास बसल्यामुळे 3 इंच असलेली मान 1 इंच राहिली होती. जखम झाल्यामुळे खराब वास सुद्धा यायला लागला होता. थोड्याच वेळात शंतनू जाळी घेऊन आला, जाळी आणल्यावर कसा आणि कुठून पकडायचा यावर चर्चा केली आणि सर्व कामाला लागले.

वानराच्या गळ्याला जखम झाल्यामुळे त्याच्या पूर्ण चेहऱ्याला सूज आली होती आणि त्याला समोरचं काही दिसत नव्हतं, आवाजाच्या दिशेने फक्त तो डोळे मिचकावून बघत होता. खूप थकलेला आणि मरणाच्या दारावर पोचलेला प्राणी अगदी माणसासारखा हातावर डोकं ठेवून शांत पडून होता. तोपर्यंत जवळच्या माणसांची भरपूर गर्दी जमली होती. गर्दीचा आवाज पाहून तो थोडा बिथरला होता.

भिंतीवर बसला असल्यामुळे त्याला नेट टाकून पकडणे तसं शक्य नव्हतं, तरीसुद्धा प्रयत्न करून पाहिला, पण थोडी चपळाई दाखवून तो बाजूच्या छपरावर गेला. आणि मग सर्वांची खरी कसरत चालू झाली. या छपराहून त्या छपरावर ते वानर आणि त्याच्या मागे बाकीचे शेवटी तो एका जुन्या कौलारू घरावर गेला.

जुनं घर असल्यामुळे तिथे जाणं तस शक्य नव्हतं, थोडी वेगळी शक्कल लढवुन फास टाकून वानर खाली आल्यावर नेट मध्ये पकडून पिंजऱ्यात टाकले. त्यानंतर पुणे येथील रेस्क्यू टीम (RESQ) पोहचली. पुणे टीम ने येऊन वानर बेशुद्ध केलं आणि पूर्ण चेक केल्यावर कळलं कि इथेच बेसिक उपचार करावे लागतील, डॉ. चेतन वंजारी, तुहीन सातारकर, अमित तोडकर, सिद्धी पंचार्य ही टीम कामाला लागली.

दीड तास शर्थीने उपचार करून व्हॅन मध्ये टाकून पुढील उपचारासाठी पुण्याला नेले. विशेष म्हणजे सर्पमित्र दत्ता सावंत यांना पेडली येथे जखमी अजगर मिळाला होता. तो दाखवल्यावर RESQ टीम ने तो सुद्धा उपचारासाठी नेले.

या सर्व मोहिमेत सुधागड वनक्षेत्र अधिकारी विकास तरसे आणि टीम यांचे पूर्ण सहकार्य होते. या मोहिमेत नामदेव मुंडे, संकेत गायकवाड, मारुती मुंडे, संदीप ठाकरे, जितेंद्र शिंदे, पांडुरंग पवार, कल्पेश, योगेश साजेकर, विनोद पाटील, मनिष खोडागळे, शंतनू लिमये व अमित निंबाळकर होते.

गरबा एक तास केला बंद

विशेष बाब म्हणजे जिथे उपचार चालू होते तिथे बाजूला उंबरवाडी मारिमाता नवतरुण मित्रमंडळाचा नवरात्री उत्सव होतो. दांडिया रसिक उपचार कधी होतील याची वाट बघत होते. आवाजने प्राणी हायपर होतो म्हणून कार्यक्रम थोडा वेळ बंद ठेवून त्यानी एक जीव वाचवायला मोलाची साथ दिली. वनविभागाने सुद्धा त्यांचे आभार मानले. RESQ टीम जाताना टाळ्या वाजवून मंडळाने त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com