
पन्हाळा : गर्भपाताचे रॅकेट उद्ध्वस्त
पन्हाळा: बेकायदेशीररीत्या गर्भपात करणाऱ्या टोळीचा पोलिस आणि वैद्यकीय पथकाने स्टिगं ऑपरेशनद्वारे पर्दाफाश केला. याप्रकरणी पडळ (ता. पन्हाळा) आणि अंबाई टँक परिसरात छापा टाकण्यात आले. दोन बनावट डॉक्टर, दोघा एजंटसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी तिघांना अटक केली. त्यांना आज कळे न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश विनोद खुळपे यांनी सोमवार (ता. ११) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत पन्हाळा पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल केला. सूत्रधार बनावट डॉक्टर उमेश लक्ष्मण पोवार (वय ४६, करंजफेण, ता. शाहूवाडी,सध्या रा. हरीओमनगर अंबाई टँक परिसर), बनावट डॉक्टर हर्षल रवींद्र नाईक (४०, रा. फुलेवाडी रिंगरोड), एजंट दत्तात्रय महादेव शिंदे (४२, रा. पडळ, पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौथा संशयित एजंट भरत पोवार पसार झाला असून, पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडळ (ता. पन्हाळा) येथे स्त्री-भ्रूण हत्या होत असल्याची तक्रार आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाला शहानिशा व कारवाईच्या सूचना होत्या. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक तयार करण्यात आले. पथक पडळमध्ये गेल्यानंतर संशयित दत्तात्रय शिंदे, भरत पोवार एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने मंगळवारी त्या दोघांशी गर्भपात करण्यासंबधी संपर्क साधला. दोघांनी त्यांना पेशंट घेऊन बुधवारी रात्री पडळला येण्यास सांगितले. त्यासाठी २५ हजार रुपये खर्च येणार असल्याचेही माहिती दिली. पथकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहपोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, महिला दक्षता समितीच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा अंबले, अंमलदार मीनाक्षी पाटील, रूपाली यादव यांचे पथक तयार करण्यात आले.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी संयुक्त पथक पडळमध्ये गेले. पथकातील एका महिलेस बनावट रुग्ण आणि अन्य दोघे तिचे नातेवाईक म्हणून रिक्षाने गेले. एजंट शिंदे त्या तिघांना एका घरात घेऊन गेला. तेथे शिवनेरी नावाचे क्लिनिक होते. तेथून त्यांना गर्भपातासाठी रंकाळा, अंबाई टँक परिसरात नेण्यात आले. येथे त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेऊन गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने येथे छापा टाकला. ताब्यात घेतलेल्या संशयित उमेश पोवारकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे चौकशीत पुढे आले. संशयित हर्षल नाईकने चौकशीत प्रमाणपत्र असल्याचे सांगितले. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी औषधे, सलाईनच्या बाटल्या, गर्भपातासाठी लागणारे साहित्य मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. क्लिनिकमधील औषधांसह, रुग्ण आणि त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांची यादी मिळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली.
याप्रकरणी अनिल कवठेकर यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार चौघा संशयितांवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ कलम ३३ (१), वैद्यकीय गर्भपात कायदा कलम २ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास अधीक्षक बलकवडे, शाहूवाडीचे उपअधीक्ष रवींद्र साळुंखे, पन्हाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, किशोर पाटील, विलास जाधववर, सहायक फौजदार नाईक करीत आहेत. तपासासाठी दोन पथके कार्यरत आहेत.
ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा
पन्हाळा तालुक्यात यापूर्वीच बनावट डॉक्टर असल्याची माहिती पसरली होती. त्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल कवठेकर यांनी ग्रामपंचायतींना अशा डॉक्टरांची चौकशी करून माहिती कळवण्याचे आवाहन केले होते.निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा बुधा-गायकवाड, पीसीपीएनडीटी सल्लागार समिती सदस्या गीता हासूरकर, लेखापाल दिलीप जाधव, विस्तार अधिकारी मारुती चौगुले, डॉ. रूपाली भिसे, कायदा सल्लागार ॲड. गौरी पाटील, गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा अंमले, महिला अंमलदार मीनाक्षी पाटील, रूपाली यादव यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
रॅकेटचा परीघ मोठा
या डॉक्टरकडे पुणे, सोलापूर, चिपळूण,पलूस, सांगली परिसरासह कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, कोपार्डे, नेर्ले आदी गावांतील महिला रुग्णांची यादी पोलिसांना सापडली आहे. यादीत रकमेचे आकडेही नमूद आहेत.
ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा
पन्हाळा तालुक्यात यापूर्वीच बनावट डॉक्टर असल्याची माहिती पसरली होती. त्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल कवठेकर यांनी ग्रामपंचायतींना अशा डॉक्टरांची चौकशी करून माहिती कळवण्याचे आवाहन केले होते.
Web Title: Panhala Abortion Racket Shattered
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..