
जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरासाठी पालकमंत्री आणि शिवसेनेच्या माध्यमातून 5 कोटींचा निधी दिला आहे.
कणकवली (सिंधुदुर्ग) - जागतिक महामारीला तोंड देत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण विकासाला न्याय दिला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरासाठी पालकमंत्री आणि शिवसेनेच्या माध्यमातून 5 कोटींचा निधी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेले काम जनताभिमुख आहे, अशी माहिती शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना तालुकाध्यक्ष शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, नगरसेविका आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, ""कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. यापूर्वी नगरोत्तम योजनेतून 6कोटी 2 लाखाचा निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला होता. शहराची गरज ओळखून क्रीडांगण जागेचे संपादन असो, रस्ते विकास असो अशा विविध कामांसाठी निधी देण्यात आला. भालचंद्र महाराज आश्रमासाठी निधि देण्यात आला. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून 5 कोटीच्या निधीची तरतूद केले आहे. यातून कणकवली शहरातील श्रीधर नाईक उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि शहरातील रस्ते विकासासाठी निधी देण्यात आला आहे.
केंद्रातील सरकारकडून फारशा अपेक्षा राहिलेल्या नाहीत तर राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक वर्ष पूर्ण होत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना काळातही चांगले काम केले. आठ महिन्याचा कालावधी निघून गेला आता जनता लॉकडाऊन बाहेर येत जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्या काळात सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयाचा फायदा जिल्ह्याला होत आहे. कोराना संकटाबरोबर अनेक नैसर्गिक संकटे आली. याचा सामना करत शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोना चाचणी केंद्र असो, ऑक्सीजन प्लांट असो, आंबा काजू बागायतदार, शेतकरी, मच्छीमार यांनाही भरघोस मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.''
वैद्यकीय महाविद्यालय मोठी भेट
राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्हातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा शब्द दिला होता तो निश्चितच पूर्ण होत आहे. जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज उभे राहत असून 966 कोटीची तरतूद झाली आहे. याच बरोबर विविध विकास कामांना शासन गतिमान करत आहे, असेही श्री. पारकर म्हणाले.
कणकवलीचा विकास होणारच
शहरातील एसटी स्थानकाचा व्यापारी संकुलनात विकास करणे, छत्रपती महाराजांचे भव्य स्मारक उभारणे, जानवली नदीवर केटीवेअर बंधारा बांधणे हे निर्णय घेण्यात आले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणातील काही समस्या आणि अडचनी सोडविण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
संपादन - राहुल पाटील