पाण्याबरोबर संरक्षक भिंतीचा भाग गेला वाहूऩ; ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष...कुठे घडले वाचा

शिवप्रसाद देसाई
Wednesday, 19 August 2020

भिंत बांधताना ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने फेब्रुवारीमध्ये माजी सरपंच बाळा आकेरकर व स्थानिक ग्रामस्थांनी बांधकाम रोखले होते.

बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी दरड कोसळली. दिवसभर या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू होती. पाण्याच्या प्रवाहाने येथील संरक्षक भिंतीचा काही भागही वाहून गेला आहे. त्यामुळे या कामाबाबत ग्रामस्थ शंका उपस्थित करीत आहेत.
 
याठिकाणी 40 लाख रुपये खर्चून बांधकाम विभागाकडून संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. भिंत बांधताना ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने फेब्रुवारीमध्ये माजी सरपंच बाळा आकेरकर व स्थानिक ग्रामस्थांनी बांधकाम रोखले होते. ठेकेदाराला यावेळी जाब विचारण्यात आला होता. त्यावेळी बांधकाम खात्याचे उपअभियंता चव्हाण यांनी याठिकाणी भेट देत चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या होत्या. 

आज सकाळी बांदा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने दगड, माती व झाडे रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली. कोसळलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने नवीन बांधकाम सुरू असलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग वाहून गेला आहे. यामुळे संरक्षक भिंतीला देखील धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची बाजूपट्टी खचल्याने मुसळधार पावसात रस्त्याला देखील धोका निर्माण झाला आहे. 

रस्त्यावर दगड, माती व पाणी असल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता असल्याने बांधकाम खात्याच्या कारभाराबाबत स्थानिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Part of the protective wall was washed away with water in sindhudurg district