रत्नागिरी : जोशीवाडी धरणातील विहिरीचा भाग कोसळला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

देवरूख - नजीकच्या निवे बुद्रूक येथील जोशीवाडी धरणातील विहिरीचा एक भाग कोसळल्याने गावात पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा दिला असला; तरी गावातील काही ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरित होणे पसंत केले आहे.

देवरूख - नजीकच्या निवे बुद्रूक येथील जोशीवाडी धरणातील विहिरीचा एक भाग कोसळल्याने गावात पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा दिला असला; तरी गावातील काही ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरित होणे पसंत केले आहे.

दोन महिन्यांपूर्वी निवे बुद्रूक जोशीवाडी धरणालगतच्या जमिनीला तडे जाण्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धरणाच्या बाजूकडील जमीन खचू लागली होती; तर तडे वाढत जाऊ लागल्याने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी संपर्क केला. आमदारांनी पाटबंधारे विभागाच्या रत्नागिरी आणि देवरूख येथील अभियंत्यांना पाचारण केले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ रश्‍मी कदम यांनी या परिसराची पाहणी करून, हा प्रकार जमीन खचण्याचाच असून, याचा धरणाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर या परिसरात ग्रामस्थांना प्रवेशबंदी करून पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणावर चौकीदार नेमला होता. 

आज सकाळी काही ग्रामस्थ धरणावर गेले असता, त्यांना धरणाच्या भिंतीलगत असलेली विहीर ढासळल्याचे दिसून आले. ही गोष्ट तातडीने सोशल मीडियावरून व्हायरल झाली आणि निवे गावात एकच घबराट पसरली. धरण फुटल्याच्या अफवाही पसरवल्याने वातावरण अधिकच गंभीर झाले.

दरम्यान, याची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे देवरूखमधील अभियंता संजय मुंगळे, निवे सरपंच अजित माने, लघुपाटबंधारे-निवेचे कर्मचारी संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजय राऊत, अरुण राजवाडे, नारायण राजवाडे, अमित गुरव आदींनी धरणाची पाहणी केली. शिवाय ढासळलेल्या विहिरीची पाण्यात उतरून पाहणी केली असता केवळ एकाच बाजूची भिंत कोसळल्याचे दिसून आले. याचा धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण मुंगळे यांनी ग्रामस्थांना दिले. 

तर विहीर कोसळली कशी? 
दरम्यान, धरणालगत असलेल्या शिंदेवाडीतील काही ग्रामस्थांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून नातलगांकडे स्थलांतरित होणे पसंत केले आहे. धरण सुरक्षित असताना विहीर कोसळली कशी, असा सवाल उपस्थित झाला आहे. पाटबंधारे विभागाने तातडीने धरणाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Part of the well in Joshiwadi dam collapsed in Ratnagiri