सावधान ! आता आला पवन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असला तरी जिल्ह्याच्या किनारपट्टीस यामुळे कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे मच्छीमारांनी स्पष्ट केले आहे. सध्या सकाळच्या सत्रात सोसाट्याच्या वार्‍याचा जोर वाढला असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुपारनंतर उत्तरेच्या दिशेने वारे वाहत असल्याचे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले. 

मालवण ( सिंधुदुर्ग ) - पूर्वमध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात पवन नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. यामुळे 5 व 6 डिसेंबर रोजी समुद्र खवळलेला राहणार असल्याची सूचना मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील माच्छिमारांनी हे दोन दिवस समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये व वॉटर स्पोर्ट्सधारकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे केले आहे.

सोसाट्याच्या वाऱ्याचा जोर 

दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असला तरी जिल्ह्याच्या किनारपट्टीस यामुळे कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे मच्छीमारांनी स्पष्ट केले आहे. सध्या सकाळच्या सत्रात सोसाट्याच्या वार्‍याचा जोर वाढला असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुपारनंतर उत्तरेच्या दिशेने वारे वाहत असल्याचे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले. 

मासेमारीवर परिणाम

निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका मत्स्य हंगामास बसला आहे. लागोपाठ आलेल्या विविध चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सातत्याने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून वादळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार समुद्रातील या वादळाचा सिंधुदुर्गच्या किनारपट्टीस फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्षात गेल्या दोन दिवसात सकाळच्या सत्रात वार्‍याचा जोर वाढला असल्याचे दिसून आले आहे. मत्स्य हंगामाच्या काळात समुद्र शांत असतो. मात्र गेले दोन दिवस लाटांच्या उंचीत काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचा मासेमारीवर परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. 

मच्छीमारांना मासळीच मिळणे कठीण

सध्याच्या मत्स्य हंगामात गेल्या काही महिन्यात मच्छीमारांना मासळीच मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे मच्छीमार समुद्रात मासेमारीस जाण्याचे टाळत आहेत. काही ठराविक मच्छीमारच सध्या मासेमारी समुद्रात उतरत आहे. सद्यःस्थितीत वार्‍याचा जोर काहीसा वाढला असला तरी दुपारनंतर त्यात बदल होत असल्याने काही प्रमाणात मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. या वादळसदृश परिस्थितीचा मोठा परिणाम जिल्ह्याच्या किनारपट्टीवर नसल्याचे पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pawan Cyclon In Sindhudurg Be Alart