जातीच्या दाखल्यांचा भार पेलता पेलेना | Ratnagiri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी : जातीच्या दाखल्यांचा भार पेलता पेलेना

रत्नागिरी : जातीच्या दाखल्यांचा भार पेलता पेलेना

रत्नागिरी : समाजकल्याण विभागाच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीवर सध्या प्रचंड ताण आहे. शासनाच्या मंजूर १० पदांपैकी ७ पदे रिक्त आहेत तर कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या ९ पदांपैकी ५ पदे रिक्त आहेत. समितीच्या मुख्य तिन्ही अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार असल्याने जातपडताळी प्रमाणपत्रांचा निपटारा करताना या अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे जातपडताळणी प्रमाणपत्राची महिनाअखेर प्रलंबित प्रकरणे २ हजार ३४ आहेत.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून या कार्यालयाचा कारभार सुरू करण्याची वेळ या अधिकाऱ्यांवर आली आहे. शासनाने याची दखल घेऊन रिक्त पदे भरण्याची गरज आहे. कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्षे कार्यालये बंद असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित होती. मात्र या कार्यालयाचे वेगळेच दुखणे पुढे आले आहे. शैक्षणिक, सेवाअंतर्गत, सेवापूर्व, निवडणूक, इतर जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी या समितीकडे आहेत. या कार्यालयाला समिती अध्यक्ष, सदस्य सचिव, स्टेनो, सीनिअर लिपिक, ज्युनिअर लिपिक, शिपाई, डीवायएसपी, पोलिस निरीक्षक अशी १० पदे मंजूर असून फक्त 3 अधिकारीच कार्यरत आहेत. उर्वरित ७ पदे रिक्त आहेत. अध्यक्षांकडे सात जिल्ह्यांचा कार्यभार आहे. चेअरमन, सदस्य सचिव यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहेत. मनुष्यबळ वाढवण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर ९ पदे भरण्यात आली आहेत; मात्र त्यापैकी चार कर्मचारी हजर असून उर्वरित ५ पदे रिक्त आहे. स्थानिक मंत्री, आमदार आणि शासनाने याची दखल घेऊन रिक्त पदांचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.

असा झालाय निपटारा

कोरोनानंतर दीड ते दोन वर्षांनी शैक्षणिक वर्षे सुरू झाली आहेत. त्यासाठी लागणारे जात पडताळणी प्रमाणपत्रांची संख्या सर्वांत जास्त आहे. गेल्या महिन्यासह चालू महिन्यातील एकूण प्रकरणे १ हजार ८६९ आहेत. त्यामध्ये वैध प्रकरणे ३८९ आहे. तेवढी सर्व निकाली काढण्यात आली आहेत. दाखल झालेल्या एकूण २ हजार ४४५ प्रकरणांपैकी ४११ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर २ हजार ३४ प्रकरणे अजून प्रलंबित आहेत.

  • शैक्षणिक १८६९ तर निकाली ३८९

  • सेवा प्रकरणे २३७, निकाली १७

  • निवडणुकीची प्रकरणे ३३९, निकाली ५

  • अतिरिक्त पदभाराचा बसतोय फटका

"कार्यालयात रिक्त पदांचा गंभीर विषय आहे. कामावर त्याचा विपरित परिणाम होत असून प्रकरणे निकाली काढताना नाकीनऊ येत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सकाळी ८ वाजल्यापासून कामकाजाला सुरवात केली तरी कामाचा प्रचंड ताण आहे."

- संतोष चिकने , जातपडताळणी समिती सचिव

loading image
go to top