आता गावातील राजकारण तापणार ; ग्रामपंचायत निवडणुकांच बिगुल लवकरच वाजणार ?

तुषार सावंत
Thursday, 3 December 2020

ग्रामपंचायत निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतच्या मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी १० डिसेंबरला होणार आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग) : मागील सात महिन्यांपासून प्रलंबित राहिलेल्या जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्‍यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने १२ डिसेंबरपर्यंत सरपंचपदाचे आरक्षण सोडत पूर्ण कराव्यात, असे आदेश दिले आहेत. याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतच्या मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी १० डिसेंबरला होणार आहे. यामुळे प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत. तेथे प्रशासक असल्याने गावातील विकास प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने निवडणुका लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करून सार्वजनिक स्तरावरील कार्यक्रमाला निर्बंध आणण्यात आले आहेत. इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांनाही कोरोना चाचणी सक्तीची केली आहे; मात्र शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उरकून घेतल्या आहेत. यामुळे पुढील एक-दोन महिन्यांमध्ये राज्यातील प्रलंबित ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - ‘विकोआ गोखलेई’ नव्या जागतिकस्तरीय फूल वनस्पतीचा शोध! -

राज्याच्या काही तालुक्‍यांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित केले आहे; मात्र कोकण विभागामध्ये पुढील पाच वर्षासाठी सरपंचपदाच्या आरक्षण सोडती अद्याप झालेल्या नाही.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे १२ डिसेंबरपूर्वी या आरक्षणाच्या सोडती कार्यक्रम पूर्ण करावयाचा आहे. तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली इन कॅमेरा या सोडती लवकरच काढल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रक्रिया राबवली जाण्याची शक्‍यता आहे. त्या अनुषंगाने हालचाली सुरू आहेत

नगरपंचायतींच्या लढतींची प्रतीक्षा 

जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या मुदत संपत आल्या आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग लवकरच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित करण्याची शक्‍यता आहे. मतदार याद्यांचे पुर्नरीक्षण पूर्ण झाली असून नव्या मतदार याद्या प्रसिद्धी १० डिसेंबरला होत 
आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात निवडणुकांचा बार पुढच्या काही दिवसात उडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

राजकीय गोटात उत्सुकता ताणली

गेल्या सहा महिन्यापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्राच्या निवडणुका थांबल्यामुळे राजकीय गोटात कमालीची उदासिनता आहे. काही मोजकेच नेते वगळता कार्यकर्ते शांत आहेत; मात्र आगामी निवडणुकांच्या गावातील राजकारण तापणार आहे.

हेही वाचा -  सिंधुदुर्गात दोन कारवायांमध्ये १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

"जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. निवडणुक आयोगाकडून त्याबाबत परिपत्रक प्राप्त झाले आहे. मतदार याद्या प्रसिद्धी झाल्यानंतर सरपंच आरक्षण व सोडत काढण्यात येईल."

- व्ही. जी. दळवी, वरिष्ठ लिपिक, निवडणुक विभाग

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pending election of 70 gram panchayat start coming soon in sindhudurg