भारताच्या सैन्यदलात कोकणातील तरूणांची संख्या झपाट्याने होतेय कमी का ते वाचा..?

मुझफ्फर खान
रविवार, 28 जून 2020

नव्याने भरती होण्याचे प्रमाण घटले ; केवळ सोशल मीडियावर राष्ट्रवादाची भावना  

चिपळूण (रत्नागिरी)  : भारताच्या सैन्यदलात कोकणातील तरूणांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर राष्ट्रवादाची भावना व्यक्त करणारा तरूण मात्र सैन्य दलातील भरतीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. 

कित्येक महिने प्रचंड मेहनत घेऊन रक्ताचे पाणी करून तरूण सैन्यात भरती व्हायचे. निवड झाल्यानंतर त्यांचे गावोगावी सत्कारही व्हायचे. सैन्यात रुजू होण्यासाठी मुंबईतून तारीख मिळाली की आनंदाने त्यांना सोडण्यासाठी गावातील लोक मुंबईपर्यंत जायचे. गावातील वडिलधारी मंडळी सैनिकांचे सामान डोक्यावर घेवून गाडीपर्यंत घेवून जायचा. गावोगावी आजही हा सन्मान सैनिकांना दिला जातो. स्वतंत्र्यप्राप्तीनंतर आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो तरूणांनी सैन्यात आपले योगदान दिले आहे. सैन्यातील मराठा रेजिमेंटमध्ये कोकणातील तरूणांची संख्या सर्वाधिक होती. खेड तालुक्यातील तिसंगी, मोरवणे, धामणंद, शिवथर ही गावे सैनिकांची गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. येथील घरटी एक माणूस सैन्यामध्ये होता. त्यांच्या निवृत्तीनंतर नव्याने भरती होणार्‍यांचे प्रमाण अत्यंत कमी झाले. 

हेही वाचा- चक्रीवादळाने नुकसान झाले पण  पंचनामा नाहीच ....

खडपोली (ता. चिपळूण) येथील दिपक कोकरे हे भारताच्या सैन्य दलात लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे स्पेशल बॉम्ब स्कॉडमध्ये कार्यरत आहेत. ते म्हणाले, सैन्य दलात 100 पैकी 40 जवान पूर्वी कोकणातील होते. नव्याने भरती होणार्‍यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे ही संख्या अत्यंत कमी झाली आहे. शंभरातील 20 ते 25 तरूण आता कोकणातील भरती होतात. हा टक्का वाढला पाहिजे. सद्यस्थितीत पश्‍चिम महाराष्ट्रातील तरूणांची सैन्य दलात सर्वाधिक संख्या आहे. सरकारकडून नेहमीप्रमाणे सैन्य भरती केली जाते. ही भरती अत्यंतपारदर्शकपणे होते. कोकणातील तरूणांना भरतीबाबत योग्य प्रशिक्षण मिळत नाही. अनेकवेळा मार्गदर्शनाअभावी तरूण या भरतीकडे फिरकत नाहीत. भरतीसाठी आपला प्रदेश सोडून इतर भागात जात नाहीत. मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील तरूण सैन्य भरतीसाठी कोणत्याही प्रदेशात जाण्यास तयार होतात. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील तरूणांची संख्या वाढत आहे. 

हेही वाचा- ब्रेकिंग - सिंधुदुर्गमध्ये सापडले  ११ कोरोना पॉझिटिव्ह ; संख्या पोहोचली १९९ वर...

13 ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर व उपनगर भागात 1 हजार पदांसाठी भरती झाली. 11 फेब्रुवारी 2020 ला त्यांची अंतिम निवड करण्यात आली. यात केवळ 24 तरूण कोकणातील आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The percentage of Konkani in the army is declining