Ratnagiri : २०० केळींची लागवड, कष्टाचे मिळाले फळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Banana

२०० केळींची लागवड, कष्टाचे मिळाले फळ

संगमेश्वर : कष्ट केले तर त्याचे फळ नक्की मिळते. मात्र, फळ मिळायला हवे असेल तर आधी कष्ट करायला हवेत. निसर्गात झालेल्या पर्यावरणीय बदलांमुळे पिकांना आणि विविध शेतमालाला फटका बसतोय, हे जरी खरे असले तरीही प्रयत्न करीत राहायलाच हवे, या उक्तीप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील प्रयोगशील युवा शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी यावर्षी आपल्याच जागेत तब्बल २०० केळींची लागवड करून केळी उत्पादनाचा अभिनव प्रयोग केला आहे.

मौजे असुर्डे या दुर्गम गावात नैसर्गिक जलस्त्रोतांच्या आधारावर मकरंद मुळ्ये दरवर्षी मिरची, चवळी, पावटा, भुईमूग, पालेभाज्या, भेंडी, वांगी यांची लागवड करतात. या सर्व शेतमालाला संगमेश्वर ही एक मोठी बाजारपेठ असली तरीही मुळ्ये यांनी असंख्य खासगी ग्राहक जोडून ठेवले असल्याने त्यांना बाजारपेठेत मोठ्या भाजी विक्रेत्याकडे कमी दरात आपला शेतमाल विकण्याची वेळ येत नाही. विविध प्रकारची भाजी संगमेश्वर बाजारपेठेत येईपर्यंत वाटेतच संपते.

भाजीपाल्याबरोबरच सुपारीचे उत्पादनही समाधानकारक असून, ठिबक सिंचनद्वारे मुळ्ये यांनी पाण्याचे नियोजन केले आहे. या पाण्यावर फळबाग फुलविता येईल, या हेतूने मुळ्ये यांनी यावर्षी सुमारे २०० केळींची लागवड केली. यासाठी त्यांनी घरी असणाऱ्या जुन्या केळींमधूनच या रोपांची निर्मिती केली. गावठी केळ्यांची जात उत्तम असल्याने त्यापासून तयार झालेली रोपे घेऊन लागवड केल्याने खर्चही कमी झाला. या रोपांना सेंद्रिय खते आणि पाण्याचे योग्य नियोजन केले असल्याने रोपांची वाढ उत्तम झाली आहे. गावठी केळ्यांना ६० ते ७० रुपये डझन एवढा दर मिळत असल्याने आपल्याला केळी विक्री करण्याची चिंता नसल्याचे मकरंद मुळ्ये यांनी विश्वासाने सांगितले.

एक नजर..

  1. भाजीपाल्याबरोबरच सुपारीचे उत्पादन

  2. ठिबक सिंचनद्वारे पाण्याचे नियोजन

  3. गावठी केळ्यांची जात उत्तम

  4. त्यापासून तयार झालेली रोपे घेऊन लागवड

  5. केळ्यांना ६० ते ७० रुपये डझन एवढा दर

  6. गोबरगॅससह सेंद्रिय खतांचा वापर

  7. शेतमालाचा दर्जाही राखला उत्कृष्ट

loading image
go to top