
प्लॅस्टिक बॉटल्समध्ये खडी, वाळू, वस्तू भरून त्याचा वापर झाडांच्या भोवती अळी करण्यासाठी केला जात आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेने काही नवे आणि वेगळे करून दाखविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. बसस्थानकातील कचरा निर्मूलनासाठी पालिकेने 'प्लॅस्टिक बॅंके'ची स्थापना केली आहे. नागरिकांनी आपला प्लॅस्टिक कचरा (पाण्याच्या, कोल्ड्रिंकच्या बॉटल्स, रॅपर्स आदी) इतरत्र न फेकता प्लॅस्टिक बॅंकेमध्ये जमा करायचा आहे. जमा प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर केला जात आहे. प्लॅस्टिक बॉटल्समध्ये खडी, वाळू, वस्तू भरून त्याचा वापर झाडांच्या भोवती अळी करण्यासाठी केला जात आहे.
रत्नागिरी पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 अंतर्गत हे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमासाठी पालिकेचे आरोग्य विभागाचे इंजिनिअर भोईर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, सावर, कांबळे, शेख आणि सुतार सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. पालिकेचे आरोग्य सभापती निमेश नायर यांनी ही संकल्पना उचलून धरत नागरिकांना प्लॅस्टिक बॅंकेत कचरा टाकण्याचे आवाहन केले आहे. प्लॅस्टिक बंदी असली तरी आजही कोल्ड्रिंक, पाण्याच्या बाटल्यांना पर्याय नाही.
हेही वाचा - हृदयद्रावक! सिमेंटच्या चालू मिक्सरमध्ये पडला तरुण; जागीच मृत्यू -
प्रवासादरम्यान अनेक प्रवासी त्याचा वापर करून बसस्थानक किंवा अन्य ठिकाणी या प्लॅस्टिकच्या बाटल्या फेकून देतात. त्यामुळे पुन्हा प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या निर्माण होते. हे टाळण्यासाठी पालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. पालिकेच्या झाडांभोवती या प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये वाळू भरून त्याची अळी केली आहेत. झाडांच्या संरक्षणाबरोबर ते दिसायलाही आकर्षक आहे. उपक्रमाची सुरवात चांगली झाली आहे. त्यामुळे संकल्पनेचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.
कपडा बॅंक
शहरातील गरजूंना मोफत कपडे मिळावेत यासाठी रत्नागिरी पालिकेने "कपडा बॅंक'ची स्थापना केली आहे. आपले वापरात न येणारे कपडे आपण आपल्या कपडा बॅंकमध्ये जमा करू शकता. या कपड्यांचा उपयोग गरजवंतांना नक्कीच होणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी त्याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
"रत्नागिरीच्या जागरूक नागरिकांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाला सहकार्य करावे जेणेकरून रत्नागिरी शहर प्लॅस्टिकमुक्त होण्यास आपले योगदान निश्चितच लाभेल. त्याचबरोबर गरजू लोकांना कपडे मिळण्यासाठी आम्ही केलेल्या एका छोट्या प्रयत्नाला आपलाही हातभार लागेल."
- निमेश नायर, आरोग्य सभापती, रत्नागिरी पालिका
संपादन - स्नेहल कदम