Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

दोन दिनसांपूर्वी दोन दुचाकीवरून तीन अनोळखी तरुण ओणीमध्ये आले होते.
Anuskura Ghat
Anuskura Ghatesakal
Summary

आज सकाळी संशयित दोघे जंगलातून बाहेर येवून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

राजापूर : दुचाकी चोरून कोल्हापूरच्या (Kolhapur) दिशेने पळून जाताना पोलिसांना पाहून अणुस्कुरा घाटातील जंगलात (Anuskura Ghat) लपलेल्या अन्य दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनतर अखेर यश आले आहे. सुमारे तीस पोलिसांचा समावेश असलेल्या चार पथकांमार्फत गेले दोन दिवस रात्रंदिवस राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेमध्ये आज (ता. 20) सकाळी जंगलातून रस्त्यावर येवून कोल्हापूरच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दोन्ही संशयित चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस (Rajapur Police) निरीक्षक राजाराम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, उपनिरीक्षक मोबीन शेख, आरसीपी टीम इन्चार्ज ज्ञानेश्वर साखरकर यांच्यासह राजापूर पोलीस व आरसीपी टीमने गेले दोन दिवस शोध मोहिम राबवून संशयितांच्या मुसक्या आवळण्याच्या केलेल्या विशेष यशस्वी कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिनसांपूर्वी दोन दुचाकीवरून तीन अनोळखी तरुण ओणीमध्ये आले होते. चारचाकी वाहनांना धाक दाखवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात होता. यावेळी झालेल्या आरडाओरडीनंतर त्या तरूणांनी तेथून पळ काढून ते ओणी येथून अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरच्या दिशेने दोन बाईकवरून निघाले होते. दरम्यान, याबाबतची माहिती रायपाटण पोलिस दूरक्षेत्राला मिळाल्यानंतर अणुस्कूरा चेकपोस्ट येथे पोलिसांनी कडक नाकाबंदी केली.

तिघे संशयित तरूण मोटर सायकलवरून अणुस्कुरा चेकपोस्टवर आले असता तेथील पोलिस नाकाबंदी असल्याचे पाहून याठिकाणी पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी तिथे ताब्यातील दुचाकी सोडून येरडव, अणुस्कुरा जंगलामध्ये पळ काढला. त्यानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात करून येरडव आणि अणुस्कूरा जंगल परिसर ग्रामस्थांच्या साथीने संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पिंजून काढला. त्यामध्ये एकजण पोलिसांच्या तावडीत सापडला तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अन्य दोघे जंगलात लपून बसले होते. शनिवार रात्रीपासून जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्री. उबाळे, उपनिरीक्षक श्री. शेख, आरसीपी टीम इन्चार्ज श्री. साखरकर यांच्यासह राजापूर पोलीस व आरसीपी टीमच्या कर्मचारी सलग दोन दिवस जंगल परिसर पिंजून काढत संशयितांचा शोध घेत होते.

आज सकाळी संशयित दोघे जंगलातून बाहेर येवून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. दीपक श्रीमंदीलकर, अजय घेडगे (दोघे रा.अहमदनगर) अशी त्या संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितांचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळ्याच्या केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com