गेले भाजी खरेदीला अन् मिळाला पोलिसांचा प्रसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

लांजा शहरात मंगळवारी तालुक्यातील नागरिक शहरात आल्याने आठवडा बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिस चेकनाक्याच्या पाठीमागे आपल्या दुचाकी लावून आजूबाजूच्या गावातून काही लोक चालत आले. 
पोलिसांनी कोर्ले फाटा येथे नाकाबंदी केली आहे.

लांजा - कोरोना संसर्गाला थोपवायचे असेल तर गर्दी टाळा, असे शासन व प्रशासन वेळोवेळी आवाहन करीत असताना देखील मंगळवारी शहरात आठवडा बाजार असल्यासारखी अचानक गर्दी झाली. येणार्‍या नागरिकांना आवरताना पोलिसांची दमछाक झाली. अखेर पोलिसांनी प्रसाद द्यायला सुरवात करताच गर्दी पांगली. पोलिसांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. 
बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. 

लांजा शहरात मंगळवारी तालुक्यातील नागरिक शहरात आल्याने आठवडा बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिस चेकनाक्याच्या पाठीमागे आपल्या दुचाकी लावून आजूबाजूच्या गावातून काही लोक चालत आले. 

पोलिसांनी कोर्ले फाटा येथे नाकाबंदी केली आहे. ज्या वाहनधारकांकडे पास आहेत, त्यालाच शहरात वाहन घेऊन येण्याची परवानगी असतानाही पास नसणारे अनेक दुचाकीस्वार शहरात पोलिसांना आढळून आले. त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. किराणा मालाच्या दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी चार तास पोलिसांना शहरात तारेवरची कसरत करावी लागली. आज बँकांमध्येदेखील गर्दी झाल्याने बँकेसमोर रांगा होत्या. सिंधुदुर्गकडून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रत्नागिरीकडे येत असता ते लांज्यात थांबले. लांज्यातील गर्दी वाढल्याचे पाहताच त्यांनी तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना धारेवर धरले. तत्काळ  उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तत्काळ बाजारात स्पीकर लावून गर्दी कमी करण्याचे आवाहन करण्यात आले. दुकानेसुद्धा बंद करण्यात आली, तर काही नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला.

यंत्रणेवर सामंतांचे ताशेरे

कोरोना रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना लांजासारख्या शहरात याचे गांभीर्य दिसून आलेले नाही. नेहमीप्रमाणे बाजार भरत असेल तर येथील यंत्रणा करते काय, असा प्रश्न खुद्द उदय सामंत यांनी विचारला आहे.

पंचायत समितीत सर्वच कर्मचारी कामावर

कार्यालयांमध्ये दहा टक्केच कर्मचारी ठेवायचे असून या आदेशाला लांजा पंचायत समितीने केराची टोपली दाखवल्याचे दिसून आले. येथील प्रशासन प्रमुखांनी सर्व कर्मचार्‍यांना कामावर बोलून आदेश धाब्यावर बसवले असल्याचे दिसून आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police lathi charge on lanja bhaji market people