कायद्याचा रक्षकच निघाला भक्षक ; बांद्यात कारकीर्द गाजवलेला पोलिस दारूतस्करीत

नीलेश मोरजकर
Saturday, 5 December 2020

या कारकीर्दीचा दारूतस्करीशी काही संबंध आहे का, हे तपासण्याची आता वेळ आली.

बांदा (सिंधुदुर्ग) : शिरोळ समतानगर (जि. कोल्हापूर) येथे गोवा बनावटीच्या दारूतस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेला मिरज येथील पोलिस कॉन्स्टेबल यमणप्पा अण्णासो वडर (वय ३३) याचे थेट संबंध गोव्यातील दारू व्यावसायिकांशी असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे. तो बांदा पोलिस ठाण्यात दोन वर्षे कार्यरत होता. या कारकीर्दीचा दारूतस्करीशी काही संबंध आहे का, हे तपासण्याची आता वेळ आली. या कारवाईत वडर याचा भाचा युवराज नागप्पा वडर यालाही ताब्यात घेतले आहे.

वडर याच्या शिरोळ-समतानगर येथील राहत्या घरीच राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इचलकरंजी पथकाने छापा टाकून एकूण पाच जणांवर अटकेची कारवाई केली. या कारवाईत विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला गोवा बनावटीच्या दारूचा एक लाख आठ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात गोवा बनावटीच्या विविध ब्रॅंडचे १६ उंची खोके जप्त करण्यात आले. यातील मुख्य संशयित यमणप्पा वडर हा कॉन्स्टेबल असून सध्या मिरज येथे कार्यरत आहे. आपल्या घरातच त्याने दारू विक्रीचे केंद्र बनविले होते.

हेही वाचा - शिवसेनेने मारली बाजी ; राष्ट्रवादीचाही धडाका, महाआघाडीत एकी नसल्याचे चित्र -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यमणप्पा वडर हा २०१५ ते २०१७ या कालावधीत बांदा पोलिस ठाण्यात कार्यरत होता. गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैद्य दारू वाहतुकीचा मार्ग हा बांदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जात होता. त्यामुळे गोव्यातील दारू तस्करांशी सीमेवरील पोलिस कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध होते. केवळ ‘टार्गेट’ पुरती कारवाई करून मर्जीतील दारू व्यावसायिकांच्या गाड्यांना कोणतीही ‘आडकाठी’ न होता बिनदिक्कत प्रवेश मिळत होता. पोलिस कर्मचाऱ्यांचे दारू तस्करांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध तत्कालीन पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी बांदा पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या इन्सुली तपासणी नाक्‍यावर ‘पाळत’ ठेवली. 

आर्थिक व्यवहार करण्यासाठी सरसावलेले पोलिस कर्मचारी अधीक्षक गावकर यांच्या कारवाईच्या जाळ्यात अलगद अडकले. २ पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. यामध्ये ‘रडार’वर असलेल्या वडार याला तत्कालीन पोलिस निरीक्षकांच्या आशीर्वादाने क्‍लीनचिट देण्यात आली. तत्कालीन निरीक्षकांची तत्काळ बदली झाल्यानंतर वडार याची मोटार वाहन विभागात बदली करण्यात आली.

दरम्यान, इचलकरंजी येथील कारवाईत पोलिस कर्मचारीच दारू तस्करीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोव्यातून इचलकरंजी येथे आठ दिवसांनी एकदा दारू वाहतूक होत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गोव्यातून सांगलीपर्यंत दारू होणाऱ्या दारू वाहतुकीबाबत स्थानिक बांदा पोलिस अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा उडणार ; पदाधिकाऱ्यांचे सरपंच आरक्षणाकडे लक्ष -

"दारूतस्करीत खुद्द पोलिस कर्मचारीच रंगेहाथ सापडल्याने यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे. यासाठी वडर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवेत असतानाचे व गोव्यातील हितसंबंधाची माहिती तपासात घेणार आहोत. रॅकेटची पाळेमुळे खणून कारवाई करणार आहोत."

- पांडुरंग पाटील, निरीक्षक, राज्य उत्पादनशुल्क, इचलकरंजी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officer found in sindhudurg case of illegal alcohol arrested