मतदानावेळी कडक बंदोबस्त, अनुचित प्रकार नाही

रुपेश हिराप
Saturday, 16 January 2021

तालुक्‍यात 11 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असतानाही खुद्द पोलिस अधीक्षकांनी सावंतवाडीमध्ये कोलगाव तसेच अन्य ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रस्थळी अचानक भेट दिली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार किंवा निवडणूक प्रक्रियेत अडथळा येण्याचा प्रकार घडला नाही. सगळीकडे चोख पोलिस बंदोबस्त होता, असे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले. 

पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी आज कोलगाव ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंखे उपस्थित होत्या. दंगल नियंत्रण पथकासह श्री. दाभाडे यांनी याठिकाणी भेट दिल्याने सर्वांनी आश्‍चर्य व्यक्त केले; मात्र जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून सर्व यंत्रणेवर लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले. 

तालुक्‍यात 11 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असतानाही खुद्द पोलिस अधीक्षकांनी सावंतवाडीमध्ये कोलगाव तसेच अन्य ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रस्थळी अचानक भेट दिली. सोबत दंगल नियंत्रण पथक होते. कोलगावमध्ये सर्व मतदान केंद्रावर श्री. दाभाडे यांनी स्वतः जाऊन पोलिस यंत्रणेकडून माहिती घेतली. 
पोलिस अधीक्षक म्हणाले, की ""जिल्ह्यात सगळीकडेच मतदान केंद्रावर भेट देत असून सावंतवाडीमध्येही ठराविक ठिकाणी जाणार आहे. जिल्ह्यात सगळीकडे शांततेत मतदान सुरू असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सगळीकडे विशेष पथकेही तैनात आहेत.'' 

कोलगावात मतदान उत्साहात 
दरम्यान, कोलगावात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. सकाळी अल्पसा प्रतिसाद असतानाच सकाळी अकरानंतर पाचही मतदान केंद्रावर मतदारांची रांग दिसून आली. राजकीय कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत होते. सगळ्या बुथवर दोन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी ठाण मांडून होते. एकीकडे शिवसेनेचे मायकल डिसोजा तर दुसरीकडे भाजपचे महेश सारंग आपल्या भावांसाठी त्या-त्या वॉर्डमध्ये विशेष लक्ष ठेवून असल्याचे दिसून आले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police security gram panchayat election sawantwadi taluka