रत्नागिरीत मासेमारीसाठी `येथील` खलाशी येण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्टपासून ट्रॉलिंगसह गिलनेटद्वारे मासेमारीला सुरवात झाली. या नौकांवर खलाशीची जास्त आवश्‍यकता लागत नाही. ट्रॉलिंगवर जास्तीत जास्त सहा ते सात खलाशी असतात.

रत्नागिरी - पर्ससिननेट मासेमारी एक सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने त्याची तयारी सुरू झाली आहे. बहुतांश नौकांवर कर्नाटकमधील खलाशी असतात. त्यांना आणण्यासाठी ई - पास तयार करावे लागणार आहेत; मात्र कोरोनामुळे पालघर, ठाण्यातील शेकडो खलाशी गुजरातकडे जाण्याऐवजी रत्नागिरीकडे वळण्याची शक्‍यता आहे. कर्नाटक, नेपाळपेक्षा राज्यातून खलाशी मिळाले तर बरे या उद्देशाने स्थानिक मच्छीमारांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. 

शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्टपासून ट्रॉलिंगसह गिलनेटद्वारे मासेमारीला सुरवात झाली. या नौकांवर खलाशीची जास्त आवश्‍यकता लागत नाही. ट्रॉलिंगवर जास्तीत जास्त सहा ते सात खलाशी असतात. गिलनेटला त्याहून कमी खलाशी असतात; मात्र पर्ससिननेट नौकांवर 25 ते 30 खलाशी गरजेचे असतात. जिल्ह्यातील पर्ससिननेट नौकांवर येणारे खलाशी हे कर्नाटक, नेपाळ येथील असतात. स्थानिक खलाशांचे प्रमाण अत्यल्प आहे.

एक सप्टेंबरपासून पर्ससिननेट मासेमारी सुरू होत आहे. त्यापूर्वी खलाशांना आणण्यासाठी मच्छीमारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कोरोनामुळे सध्याच्या मासेमारीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. परराज्यातूनच नव्हे तर राज्यांतर्गत प्रवास करतानाही ई - पास आवश्‍यक आहे. अन्य राज्यांतून खलाशी आणण्यासाठी पास काढणे, क्‍वारंटाईन करून ठेवणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या दृष्टीने मच्छीमारांकडून पावले उचलली जात आहेत.

एकवेळ कर्नाटकमधील खलाशी येतीलही, पण नेपाळी लोकांना इकडे येत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामध्येही काही मच्छीमारांकडून अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात एक चांगला पर्याय शोधला आहे. पालघर, ठाणे येथील अनेकजण गुजरातमध्ये खलाशी म्हणून काम करतात. ते परराज्यात जाण्याऐवजी रत्नागिरीकडे वळण्याची शक्‍यता आहे. 

वादळामुळे मच्छीमारी ठप्प 
शनिवारपासून वादळी वाऱ्यांसह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सलग दोन दिवस मच्छीमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. गुहागर पाठोपाठ दापोली केळशी येथे नौका उलटून अपघात झाल्यामुळे मच्छीमारांनी धसका घेतला आहे. गेल्या काही दिवसांत टायनी, पापलेट, कोळंबी बऱ्यापैकी सापडत होती. पापलेटला वजनानुसार 170 ते 1050 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी आवरते घेतले असून सर्वच नौका किनाऱ्यावर आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility Of Sailors From Palghar Thane For Fishing In Ratnagiri