रोणापालमध्ये आकडा टाकून वीज चोरी 

Power theft by throwing numbers in Ronapal
Power theft by throwing numbers in Ronapal

बांदा ( सिंधुदुर्ग ) - ग्रामीण भागात अद्यापही वीज चोरी होत असल्याचे वास्तव रोणापालमध्ये समोर आले आहे. आकडा टाकून वीज चोरी होत असल्याची तक्रार देऊनही महावितरण संबंधितांवर कोणतीच कारवाई करत नसल्याने वीज ग्राहकांनी येथील सहायक अभियंता अनिल यादव यांना धारेवर धरत जाब विचारला. वीज ग्राहकांच्या प्रश्‍नावर अधिकारी मात्र निरुत्तर झाले. 

रोणापाल मळी क्षेत्रात स्पार्किंग होऊन आग लागलेल्या बागेची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पाहणी दरम्यान वीज ग्राहकांनी विचारणा केली. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच पप्या केणी, वीज ग्राहक उदय देऊलकर, कृष्णा केणी, प्रकाश गावडे, वायरमन नारायण मयेकर उपस्थित होते. 

जानेवारी ते एप्रिल असे चार महिने आकडा टाकून वीज चोरीचा प्रकार सुरू असल्याचे कृष्णा केणी यांनी सांगितले. याबाबत तक्रार होऊनही वीज वितरण कारवाई का करत नाही? तसेच या प्रकाराला कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल श्री. केणी यांनी श्री. यादव यांना केला. आकडे टाकून वीज घेतल्यामुळे रोहित्रात बिघाड होण्याची शक्‍यता आहे. परिणामी संपूर्ण गावाला अंधारात रहावे लागते. वीज चोरी रोखण्यासाठी येथील महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रकाश गावडे यांनी केला.

वीज चोरी ही एक मोठी समस्या आहे. नियमित वीज बिल भरूनही अनेकांना वीज पुरवठा अखंडित होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. रोणापाल गावात जर वीज चोरी होत असेल अन्‌ तक्रार करूनही महावितरणकडून कोणतीच कार्यवाही होत नसेल तर याची गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे, रोणापाल सरपंच गावडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. अभियंता यादव यांनी ज्या व्यक्तीविरोधात वीज चोरीची तक्रार आलेली आहे. त्याविरोधात नक्कीच कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले. गावात जर असा प्रकार अन्य कोणाकडूनही होत असेल तर त्याची माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

""दोन महिने वीज बिल न भरल्यास महावितरणकडून विचारणा केली जाते; परंतु दोन ते तीन महिने वीजेची चोरी होत असून तक्रार देऊन सुद्धा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. येत्या दोन दिवसांत रोणापाल गावातील वीज चोरीवर कारवाई करावी.'' 
- देऊलकर, माजी सरपंच 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com