त्सुनामीचा संदेश आला अन् गावकऱ्यांचा एकच गोंधळ उडाला

राधेश लिंगायत
Wednesday, 21 October 2020

दापोली तालुक्याचे पोलीस प्रशासन एकदम खडबडून जागे झाले. सर्व साहित्यांसाहित पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. 

हर्णे (रत्नागिरी) : त्सुनामी येणार असा पोलीस खात्याच्या वरिष्ठ कार्यालयाकडून संदेश प्राप्त झाला. पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली आणि त्यांचे कार्य सुरू झाले. पोलीस खात्याची रंगीत तालीम व्यवस्थित पार पडली. २० ऑक्टोबर रोजी त्सुनामी येणार असा पोलीस खात्याच्या वरिष्ठ खात्याकडून संदेश मिळाला आणि दापोली तालुक्याचे पोलीस प्रशासन एकदम खडबडून जागे झाले. सर्व साहित्यांसाहित पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. 

हेही वाचा - कोकण मार्गावर शुक्रवारपासून धावणार फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या -

त्सुनामी येणार म्हणून सायरन वाजवत आणि लोकांना ध्वनिक्षेपकाद्वारे त्सुनामीची कल्पना देत पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोचले. वेगाने हर्णे बंदर किनाऱ्याजवळील वस्तीतील ग्रामस्थांना त्सुनामीची कल्पना दिली आणि या सर्व धोकादायक वस्तीतील ग्रामस्थांना सुरक्षित जागी हलवले. फत्तेगडावरील सर्व ग्रामस्थांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी नेले. 

अपंग व्यक्तींना व्हीलचेअरवर बसवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. मोठमोठ्या लाटांचा मारा होणार असल्याने संपूर्ण वस्ती खाली केली. जूनमध्ये झालेले निसर्ग वादळ येण्यापूर्वी देखील पोलीस कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारे फत्तेगडावरील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. आता लगेच त्सुनामी येणार म्हणून ग्रामस्थ थोडे घाबरून गेले. परंतु त्सुनामी येण्यापूर्वी करण्यात आलेली कार्यवाही आणि त्सुनामी येऊन गेल्यानंतर करायची कार्यवाही याची रंगीत तालीम असल्याचं कळल्यावर ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. 

यावेळी दापोली तालुक्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आपण समुद्राच्या खूप जवळ रहात असून त्सुनामी आल्यावर कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ? आपल्या राहत्या घरातून ताबडतोब बाहेर पडणे गरजेचे आहे. कोणीही या घटनेमध्ये दगावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तातडीने कोणकोणत्या संबधित खात्याला कळवलं पाहिजे याची माहिती दिली. 

हेही वाचा - रत्नागिरीतील 7 पोलिस हवालदार झाले पीएसआय -

अशा अनेक सूचना या तालीमीच्या वेळी पो. निरीक्षक पाटील यांनी ग्रामस्थांना केल्या. या तालिमीच्यावेळी दापोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश तडवी, हर्णे पोलीस दुरक्षेत्राचे अंमलदार  मोहन कांबळे, सागर कांबळे, संबंदास मावची, राहुल सोलनकर, सुशील मोहिते, काळू पटेकर,  कमलाकर चौरे, मोहन देसाई, रमेश जड्यार, आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the practice of tsunami disaster management during tsunami in konkan area by police officers