विजयदुर्गचा जागतिक वारसा जतन होण्यासाठी याची गरज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

हेलियमचे पाळणाघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्गवर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोनामुळे सुरक्षित अंतर राखून "जागतिक हेलियम डे' साजरा करण्यात आला.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्ग येथे लागलेल्या हेलियम वायूच्या शोधाची जागा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेतून अधोरेखित व्हावी. हेलियम वायूच्या शोध लागलेल्या दिवसाचा जागतिक वारसा जतन होण्याची आवश्‍यकता असल्याचे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज विजयदुर्ग येथे व्यक्‍त केले. पुढील पिढीला विज्ञानाची कास धरण्याची गरज असल्याने विजयदुर्गला खगोल केंद्र उभारण्याची गरज आहे. यासाठी आपले प्रयत्न असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

हेलियमचे पाळणाघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्गवर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोनामुळे सुरक्षित अंतर राखून "जागतिक हेलियम डे' साजरा करण्यात आला. 18 ऑगस्ट 1868 ला सूर्यग्रहणावेळी नॉर्मन लॅकियर शास्त्रज्ञाने किल्ले विजयदुर्गवर ज्या ठिकाणी आपल्या दुर्बिण लावून हेलियम वायूचा शोध लावला होता, त्या "साहेबांचे ओटे' स्थळावर मान्यवरांनी पुष्प अर्पण केले. पावसाळ्यातील हिरवळीने नटलेला किल्ला "जय जवान, जय किसान, जय विज्ञान' घोषणांनी दणाणला. 

यावेळी माजी आमदार ऍड. अजित गोगटे, सभापती सुनील पारकर, उपसभापती अमोल तेली, कणकवली सभापती दिलीप तळेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, पंचायत समिती सदस्या पूर्वा तावडे, गणेश राणे, संजना आळवे, रवींद्र शेटये, सरपंच प्रसाद देवधर, रवींद्र तिर्लोटकर, उत्तम बिर्जे, वर्षा लेले, प्रदीप साखरकर, संदीप बांदिवडेकर उपस्थित होते. 

""विजयदुर्ग किल्यावरून शास्त्रज्ञांनी हेलियम वायूचा शोध लावल्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. "हेलियम' ब्रह्मांडाची नांदी असल्यामुळे येथील जागतिक वारसा जतन होऊन विजयदुर्ग ठिकाण जगाच्या नकाशावर येण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. विद्यार्थ्यांमधील कुतूहल अभ्यासण्यासाठी खगोल केंद्राची आवश्‍यकता असून त्यासाठी आपले प्रयत्न आहेत.'' 
- प्रमोद जठार, माजी आमदार  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pramod Jathar Comment On VIjaydurg Sindhudurg Marathi News