सांघीक काम भाजपला खुपते - सामंत

नंदकुमार आयरे
Sunday, 29 November 2020

महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत. कोरोना संकटांमध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे कार्यरत आहे. त्यामुळे भाजप आमदारांच्या मनात आमदारकीची भीती आहे.

सिंधुदुर्गनगरी -  आघाडी सरकारच्या सांघीक प्रयत्नातून महाराष्ट्रात होत असलेला विकास भाजपच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे त्यांचे नेते आमदारकी टिकवण्यासाठी टीका करीत आहेत; पण त्याचा फायदाच होत असून त्यातून प्रोत्साहन मिळत आहे, असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 
शरद कृषी भवनात आयोजित पत्रकर परिषदेत पालकमंत्री सामंत बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, अरूण दूधवडकर, चेअरमन सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संग्राम देसाई, संजय पडते उपस्थित होते. 

महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत. कोरोना संकटांमध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे कार्यरत आहे. त्यामुळे भाजप आमदारांच्या मनात आमदारकीची भीती आहे. त्यातूनच आमदारकी टिकवण्यासाठी आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव त्यांनी आखला आहे. आघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातही वैद्यकीय महाविद्यालय, महामार्ग चौपदरीकरण यांसारखी महत्त्वाची कामे होत आहेत, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. 
आरोग्य यंत्रणेची आज महत्वपूर्ण बैठक झाली. कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, याकडे लक्ष आहे.

दोन मास्क व सॅनिटायझर घरोघरी देण्याचा निर्णय घेतला आहे. लेप्टोची साथ लक्षात घेवून पुरेशी औषध व्यवस्था केली आहे. सुमारे 8 कोटी रूपये कोरोनावर खर्च झालाय. 966 कोटी राज्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी तरतूद केली आहे. जिल्हावासीयांची होणारी दिशाभूल थांबवा, असे पालकमंत्री सामंत कडाडले. 
महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झालंय. सर्व पैसे आता विकासाला मिळणार आहेत. विकासाला निधी कमी पडू देणार नाही. याकडे लक्ष देत आहोत. 8 महिने जर कोरोनाचे नसते तर विकास काय असतो हे दाखवून दिले असते, असे पालकमंत्री म्हणाले. 

"त्या' प्रकरणांची होणार चौकशी 
जिल्ह्यातील रखडलेल्या रस्ता डांबरीकरणाची कामे लवकरच पूर्ण होतील. कुडाळ तालुक्‍यातील झाराप येथील अल्पवयीन मुलीचा झालेला विनयभंग, माणगाव येथे दारू अड्ड्यावरील वादाच्या भोवरात सापडलेली धाड, माणगावमधील मटक्‍यावर धाड टाकून मॅनेज केलेले प्रकरण या सर्व प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Press Conference of Guardian Minister Uday Samant