भाजी मार्केट उभारणीत फसवणूक ः पारकर

press conference kanhaiya parker
press conference kanhaiya parker

कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरात भाजी मार्केट उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे. तसा आरोपही कणकवली नगराध्यक्षांनी सभागृहात केला आहे. त्यामुळे तेलींनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी आज केली. 

दरम्यान भाजी मार्केट फसवणूकीबाबत त्या असोसिएटवर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यासाठी नगराध्यक्षांनी आग्रही भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे तशी मागणी करणार असल्याचेही श्री.पारकर म्हणाले. 
येथील शिवसेना कार्यालयात श्री.पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत नगरपंचायत विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक, नगरसेवक रूपेश नार्वेकर उपस्थित होते.

श्री. पारकर म्हणाले, ""येथील भाजी मार्केट नगरपंचायतीनेच विकसित करावी अशी भूमिका आम्ही सातत्याने मांडली; मात्र तेलींनी आपले राजकीय वजन वापरून आणि सत्तेच्या जोरावर भाजी मार्केट उभारणीबाबत नगरपंचायतीशी करार करून घेतला; मात्र पुढे हा करारही त्यांनी पाळला नाही. त्यामुळे करार झाल्यानंतर पुढील सहा महिन्यातच 17 मार्च 2018 ला नगरपंचायतीने संबंधित असोसिएटला बांधकाम थांबविण्याची नोटिस दिली; मात्र त्यांनी चुकीचे काम सुरूच ठेवले.'' 

ते म्हणाले, ""भाजी मार्केट साठी आरक्षित असलेल्या 32 गुंठे जागेत सध्या बांधकाम सुरू आहे. या 32 गुंठेपैकी पैकी 12 गुंठे जागा आणि 17 हजार चौरस फुटाचे बांधकाम त्या असोसिएटचे राजन तेली हे नगरपंचायतीला करारानुसार देणार आहेत; मात्र भाजी मार्केटचे बांधकाम करताना तळमजल्यावर पार्किंग आणि उर्वरित तीन मजल्यावर गाळे आणि भाजी विक्रीचे कट्टे बांधण्यात आले आहेत. एका मजल्यावर फक्‍त 42 विक्रेत्यांची सोय होणार आहे. शहरात 300 हून अधिक भाजी, फळ, फुल विक्रेते आहेत. त्यामुळे भाजी मार्केट बांधूनही शहरातील भाजी विक्रेत्यांचे तेथे स्थलांतर होणार नाही.'' 

श्री. पारकर म्हणाले, ""नगरपंचायतीला 12 गुंठे जागा देण्याच्या मोबदल्यात विकासकाने संपूर्ण 32 गुंठे जागेचा एफएसआय घेतला आहे. या विकासाकाच्या इमारती दर्शनी भागात आणि रस्त्यालगत आहेत. भाजी मार्केट अडगळीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहे. तेथे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता देखील नाही. ग्राहक पहिल्या मजल्यापर्यंतच भाजी व इतर वस्तू खरेदीसाठी जाऊ शकतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर भाजी मार्केट उभारल्याचे उदाहरण आपल्या देशात तरी नाही. त्यामुळे 17 हजार चौरस फुटाचे बांधकाम बांधून देत असल्याचा तेली यांचा दावा खोटा आहे.'' 

...तर फौजदारी दाखल करण्याची मागणी 
नगरपंचायत सभेत खुद्द नगराध्यक्ष नलावडे यांनीच विकासकांनी शहरवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. नगराध्यक्ष हे भाजपचे आहेत. तर त्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष तेली आहेत. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे त्यांनी तत्काळ जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा. नगराध्यक्षांनीही विकासकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडायला हवे. नगराध्यक्षांनी तसे न केल्यास विरोधक प्रशासनाकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करू, असे पारकर म्हणाले. 

चिल्लर लोकांच्या वक्तव्याची दखल घेत नाही ः  तेली 

कणकवली - भाजी मार्केटप्रश्‍नी माझ्यावर चिल्लर लोकांकडून आरोप झाले आहे. त्याची दखल घ्यावी असे मला वाटत नाही. त्यांच्या आरोपांना माझे कार्यकर्तेच उत्तर देतील, असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज लगावला. भाजप पक्ष सोडून कुणीही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी जाणार नाही असेही ते म्हणाले. 

येथील नगरपंचायतीच्या भाजी मार्केट प्रश्‍नी विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी आज राजन तेली यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना श्री.तेली यांनी, आपण चिल्लर लोकांची दखल घेत नसल्याचे स्पष्ट केले. आमच्यावर जे आरोप झाले असतील, त्या सर्वांची उत्तरे द्यायला आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर भाजी मार्केट गैरसोईचे असल्याचीही टीका पारकर यांनी केली होती. या मुद्‌द्‌यावरही बोलताना श्री.तेली यांनी भाजी मार्केट प्लानबाबत अधिक माहिती आमच्या कार्यालयातही मिळू शकेल. तेथील कर्मचारीही पारकर यांना अधिक माहिती देऊ शकतात असे उत्तर दिले.

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com