चुकीचे ठराव रद्द करून दाखवा ः परब

रुपेश हिराप
Tuesday, 26 January 2021

कॉलेज रोड परिसरातील ते नऊ स्टॉल हटविण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आले आहे. त्यासंदर्भात प्रशासन भूमिका ठरवेल; मात्र स्टॉल हटवल्यास संबंधितांचे आपण पुनर्वसन करू, असेही श्री परब म्हणाले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोणीही बोलला म्हणून कोण परप्रांतीय होऊ शकत नाही. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आरोप केलेल्या "त्या' दोन व्यक्ती या शहराचे मतदार आहेत. साळगावकर यांनीही आपल्या कारकीर्दीत अनेक चुकीचे ठराव घेऊन अनेकांना पालिकेची मालमत्ता भाडेतत्त्वावर दिली होती. त्यामुळे त्यांनी उगाचच ओरड न करता आम्ही जर चुकीच्या पद्धतीने ठराव घेतले असतील तर त्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे 308 खाली दावा दाखल करून ते ठराव रद्द करावेत, असे आव्हान नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिले. 

कॉलेज रोड परिसरातील ते नऊ स्टॉल हटविण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आले आहे. त्यासंदर्भात प्रशासन भूमिका ठरवेल; मात्र स्टॉल हटवल्यास संबंधितांचे आपण पुनर्वसन करू, असेही श्री परब म्हणाले. 
येथील पालिकेच्या लोकमान्य सभागृहात नगराध्यक्ष श्री. परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नासिर शेख उपस्थित होते.

श्री. परब म्हणाले, ""शहरामध्ये परप्रांतीय लोकांना सत्ताधारी चुकीच्या पद्धतीने ठराव घेऊन गाळा आणि जुन्या बस स्टॉपची जागा भाडेतत्वावर देत आहेत, असा आरोप साळगावकर यांनी केला; मात्र कोणीही बोलला म्हणून कोण परप्रांतीय होऊ शकत नाही. आज ज्या दोन व्यक्तींना भाडेतत्त्वावर जागा देण्यात आली ते या शहराचे नागरिक तसेच मतदार आहेत. श्री. साळगावकर यांनीही आपल्या कारकीर्दीत अनेक चुकीचे ठराव घेऊन अनेकांना पालिकेची मालमत्ता भाडेतत्त्वावर दिली होती. त्यामुळे त्यांनी उगाचच ओरड न करता आम्ही जर चुकीच्या पद्धतीने ठराव घेतले असतील तर त्याच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे 308 खाली दावा दाखल करून ते ठराव रद्द करावेत.'' 

श्री. परब पुढे म्हणाले, ""शहरातील एका हॉटेलसाठी जागा देताना साळगावकरांनी पाच लाख रुपये घेतले असा आपला आरोप आहे. शहरातील इमारतीच्या पार्किंगमध्ये आजचे स्टॉल उभे आहेत त्यामध्येही साळगावकर यांनी आर्थिक व्यवहार केला होता. आज याठिकाणी पत्र्याची शेड उभारून साळगावकर आपल्या ऑफिस केलेले आहे. ही शेडही अनधिकृत आहे. याठिकाणी जाण्याची वाट आहे. त्यामुळे त्यांनी उगाच टीवटीव करू नये.'' 

ते म्हणाले, ""शहरातील कॉलेजरोड परिसरात जे नऊ स्टॉल उभे आहेत त्या मागील एका व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. गेली कित्येक वर्षे ते यासंदर्भात तक्रार करत आहेत. त्यामुळे ते स्टॉल हटवण्यात यावेत असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे ते स्टॉल हटवण्याची भूमिका प्रशासनाची आहे. उद्या हे स्टॉल हटवल्यास त्याठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नक्कीच पुनर्वसन करू.'' 

बोलविता धनी वेगळाच 
कचरा प्रकल्पावरून कारिवडे येथील सरपंचामागे बोलविता धनी वेगळाच आहे. त्याला आम्ही जग जाहीर करू. कचरा प्रकल्पाचे काम झाले आहे. फक्त उद्‌घाटनाची वाट पाहत असल्याचे नगराध्यक्ष परब म्हणाले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: press conference mayor sanju parab sawantwadi konkan sindhudurg