esakal | उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत 300 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; 155 तडीपार
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत 300 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; 155 तडीपार

कोकणातील हा सर्वांत मोठा सण असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची विशेष खबरदारी आम्ही घेतली आहे.

रत्नागिरीत 300 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; 155 तडीपार

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी जिल्हा पोलिस दलाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या सुमारे ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तर १५५ जणांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे. येत्या दोन दिवसात त्यावर अंमलबजावणी होईल. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलिस दलातर्फे विविध ठिकाणी २५० बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गर्ग म्हणाले, कोकणात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा होतो. कोकणातील हा सर्वांत मोठा सण असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची विशेष खबरदारी आम्ही घेतली आहे. म्हणून गुन्हेगारी वृत्तीच्या जिल्ह्यातील ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तसा बॉण्ड (हमी) घेतला आहे. त्या-त्या भागात राहून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील १५५ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: राज्यभरातून 3 लाखांवर चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल

दोन दिवसात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यात येण्याचे दोनच मार्ग आहेत. त्यामध्ये रेल्वे मार्ग आणि महामार्गाचा समावेश आहे. रेल्वे मार्गासाठी आम्ही विशेष नियोजन केले आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांचे आरक्षण महत्त्वाचे आहे. ज्याचे आरक्षण निश्चित झाले आहे त्यांनाच प्रवास करता येईल. त्यानुसार रेल्वे स्थानकावर आम्ही प्रवाशांसाठी एसटीची व्यवस्था करणार आहे. आरक्षण असणाऱ्यांनीच प्रवास करावा. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी २० मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. अपघातासारखी दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत कार्य मिळावे म्हणून क्रेन, जेसीबी, रुग्णावाहिका, आरोग्य पथक तैनात ठेवली आहेत.

पोलिस दलाच्या २५० बैठका

गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिस दलातर्फे २५० बैठका घेण्यात आल्या आहेत. यामध्ये १७ मंडळस्तर बैठका, १८ शांतता कमिटीच्या बैठका, मोहल्ला कमिटीच्या २२ बैठका, पोलिस पाटील स्तरावरील १९ बैठका, समन्वयासाठी ६ बैठका आणि पोलिस अधिकारी यांनी मोठ्या गावात घेतलेल्या १७२ बैठकांचा यात समावेश आहे. गणेशोत्सव कालावधीतही बैठका सुरूच राहणार आहेत. पोलिस दलाने ग्राम दत्तक योजनेत ५० गावे घेतली आहेत. या सर्व गावांमध्ये गणेशोत्सव काळात कोविड नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती आणि खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

loading image
go to top