सिंधुदुर्गात मत्स्यखवय्यांनी केली समुद्रकिनारी गर्दी ; काय कारण ?

प्रशांत हिंदळेकर
Wednesday, 19 August 2020

मत्स्यखवय्यांची आज समुद्रकिनारी मोठी गर्दी

मालवण (सिंधुदुर्ग) : किनारपट्टी भागात गेले दोन दिवस मोरी मासळीची चांगली बंपर कॅच मिळाली आहे. श्रावण संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी मत्स्यखवय्यांनी आज समुद्रकिनारी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात २५० रुपये किलो मोरीचा दर ३०० रुपयांपर्यंत वधारला होता. गतवर्षीच्या मासेमारी हंगामात म्हणावी तशी मासळीची कॅच मिळाली नाही. त्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली.

हेही वाचा - रत्नागिरीत पावसाने मारली इतकी मजल...

पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी, एलईडीची विध्वंसकारी मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीच मिळत नव्हती. कोरोनाच्या संकटाचा फटका मासेमारी हंगामास बसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक घडी बिघडल्याने मच्छीमारांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाल्याचे दिसून आले. नव्या मासेमारी हंगामाची दमदार सुरवात होईल अशी अपेक्षा मच्छीमार बाळगून होते. 

१ ऑगस्टपासून मासेमारी हंगामास सुरवात झाली. मात्र वादळी वारे, अतिवृष्टीमुळे मासेमारीस सुरवात झाली नाही. मात्र गेल्या काही दिवसात स्थानिक मच्छीमारांना बांगडा, पेडवे, पापलेट, मोरी यासारखी किरकोळ मासळीचे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मासळीची चांगली कॅच मिळेल अशी मच्छीमारांना आशा होती. यातच गेल्या दोन दिवसात मच्छीमारांना मोरी मासळीची मोठी कॅच मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. मोरीची आवक वाढल्याने ५०० ते ५५० रुपये किलो दराने मिळणाऱ्या मोरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. 

हेही वाचा - गणेशोत्सव चार दिवसांवर तरी `या` तालुक्यात `कही खुशी कही गम`...

श्रावण संपल्याने येत्या गणेशोत्सवापूर्वी मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी मत्स्यखवय्यांनी आज समुद्रकिनारी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळी २५० रुपये किलो मोरीचा दर ३०० रुपये किलोपर्यंत वधारल्याचे दिसून आले. सध्या पर्यटन व्यवसाय बंद असल्याने मासळीची मागणी म्हणावी तशी नाही. त्यामुळे दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. मासळीची चांगली कॅच मिळाल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून आले.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the price of fish increases in today and people crowd on beach in sindhudurg