प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत उद्यापर्यंत ; मात्र कोकणात कृषी विमा योजनेला प्रतिसाद नाही.. का वाचा.....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

५०७ जणांनीच उतरवला पीक विमा : आणेवारी कमी असल्याने शेतकऱ्यांची पाठ..

रत्नागिरी : भात, नागली पिकांसाठी खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत संपण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच जिल्ह्यात अवघ्या ५०७ शेतकऱ्यांनी विम्याला पसंती दिली. आणेवारी कमी असल्यामुळे विम्याचा लाभ मिळत नसल्याने अनेक शेतकरी याकडे पाठ फिरवतात; मात्र गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभांश देण्यात आला होता. त्यामुळे यंदा शेतकरी अधिक वळतील, हा अंदाज फोल ठरला आहे.

यंदा शासनाने विमा योजना निकषात बदल करून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही रत्नागिरीत शेतकऱ्यांना विमा उतरवण्यासाठी अडचण आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांना विमा उतरवण्यात अडचण येत असेल तर त्यांना कृषी सहायक यांनी मदत करावी, अशी सूचना दिली आहे. कोकणात कृषी विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत नाही.

हेही वाचा- तब्बल 24 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा -

जिल्ह्याची आणेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्यामुळे विम्याचा लाभ मिळत नाही; मात्र गतवर्षी ऐन हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने सरसकट शेतकऱ्यांना विमा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुमारे १०४८ शेतकऱ्यांना २० लाख रुपयांचा लाभांश मिळाला होता. हे लक्षात घेऊन यंदा पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती; परंतु जिल्ह्यात आतापर्यंत ५०७ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या २३९, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या २६८ आहे. विमा उतरवण्यासाठी ३१ जुलैपर्यंत 
मुदत आहे.

हेही वाचा- कोरोना स्वयंसेवकांचे तडकाफडकी निर्णय अन् प्रशासनाची डोकेदुखी -

कोरोनामुळे शेतकऱ्यांना विमा उतरवण्यात अडचणी येणार नाहीत, याची काळजी कृषी विभाग घेत आहे. कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
-व्ही. एम. हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी.

हेही वाचा-धक्क्यावर धक्के...कारिवडेतील ग्रामस्थांचे धाबे दणाणले -

तालुका           शेतकरी
चिपळूण           ९७
दापोली             १८
खेड                  ४१
गुहागर              ४०
मंडणगड           ८४
रत्नागिरी         १४२
संगमेश्‍वर        ३४
राजापूर          ४३
लांजा             ८

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister gricultural Insurance Scheme in Konkan is not getting good response