संसार फुलण्याआधीच खड्ड्यांनी घेतला बळी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

चिपळूण - शहरातील बहादूरशेखनाका गांधीनगर परिसरात एकाच खोलीत राहणारे चौघांचे कुटुंब. आई, वडील, सातत्याने आजारी. काम केले तरच संसाराचा गाढा हाकणार अशी स्थिती. याच कुटुंबाचा कणा असलेली शिंदे कुटुंबातील प्रियांका मोहन शिंदे या तरुणीचा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यातून प्रवास करताना अपघात झाला. मेंदूला जबर मार लागल्याने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दुर्दैवी अंत झाला.

चिपळूण - शहरातील बहादूरशेखनाका गांधीनगर परिसरात एकाच खोलीत राहणारे चौघांचे कुटुंब. आई, वडील, सातत्याने आजारी. काम केले तरच संसाराचा गाढा हाकणार अशी स्थिती. याच कुटुंबाचा कणा असलेली शिंदे कुटुंबातील प्रियांका मोहन शिंदे या तरुणीचा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यातून प्रवास करताना अपघात झाला. मेंदूला जबर मार लागल्याने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दुर्दैवी अंत झाला. २१ वर्षीय प्रियांकाचा विवाह ठरला होता. संसार फुलण्यापूर्वीच तिचा अंत झाल्याने शहर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

मोहन शिंदे आपल्या पत्नी व दोन मुलांसमवेत बहादूरशेखनाका येथील गांधीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. एम.ए.चे शिक्षण घेतलेली प्रियांका खासगी नोकरी करते. तिला एक लहान भाऊ बारावी झाला असून तोही खासगी कामे करून घरच्या परिस्थितीला हातभार लावतो. प्रियांकाची आई घरकाम करून संसाराला हातभार लावते. वडीलही मजुरीचे काम करतात. मात्र दोघेही वारंवार आजारी असल्याने प्रियांका कष्टाने कुटुंबाला हातभार लावत होती. तिचा विवाह ठरला होता. नियोजित पतीच्या घरी पूजा असल्याने ती त्याच्याबरोबर दुचाकीवरून निघाली होती.

पॉवरहाऊस येथे खड्ड्यात दुचाकी आदळल्याने ती रस्त्यावर कोसळली. यामध्ये तिच्या डोक्‍याला मोठी दुखापत झाली. तत्काळ तिला भोंगाळे येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथून तिला अधिक उपचारासाठी कोल्हापुरात हलवण्याची सूचना झाली. मात्र व्हेंटीलेटर असलेली रुग्णवाहिका पाच तास मिळाली नाही. रात्री बारा वाजता रुग्णवाहिकेने तिला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.  

माझा भाऊ गेला याचे दु:ख आहेच, पण काबाडकष्ट करून संसाराचा गाडा ओढणारा बबन खरात आणि स्वप्न फुलायच्या आधीच प्रियांकाचा बळी गेला, याचे अतिव दु:ख आहे. याबाबत जबाबदार असणाऱ्यांना नक्कीच त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे चिपळूणकरांचे काम आहे. यातून खरात आणि शिंदे यांना मदतरूपी न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे.
- शिरीष काटकर,
चिपळूण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Shinde death in an accident due to Pits on Road