भेसळीमुळे सिंधुदुर्गातील काजूपुढे `ही` समस्या

एकनाथ पवार
Wednesday, 2 September 2020

एक नजर 
* पॅकिंगवर काजूविषयीचे वर्गीकरणे हवे 
* भेसळ रोखण्यासाठी यंत्रणेची गरजेचे 
* गावठी काजूला सेंद्रीय म्हणून मान्यता हवी 
* काजूतील फरक स्पष्ट करणारी चळवळ राबविण्याची गरज 

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - दर्जेदार असलेल्या जिल्ह्यातील काजूच्या नावाखाली परदेशातून आलेला बेचव काजू खपविण्याचा प्रकार काही लोक जिल्ह्यात करीत आहेत. त्यामुळे चविष्ठ असलेला जिल्ह्यातील काजूची मात्र बदनामी होत आहे. कार्यक्षम यंत्रणेअभावी भेसळ रोखण्याचे मोठे आव्हान सध्या जिल्ह्यातील काजू बागायतदारांसमोर आहे. 

काजू चविष्ठ असल्याने परदेशासह देशातर्गंत मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यातील काजूवर प्रकिया करून तो निर्यात केला जातो. परदेशातून आयात केलेला बेचव काजू बीवर प्रकिया करून, तो जिल्ह्यातील उत्पादन म्हणून विक्री केला जात आहे. काजू पॅकिंगवर सिंधुदुर्गाचे लेबल असल्यामुळे सहसा त्याला कुणीही ग्राहक आक्षेप घेत नाही. एखाद्या ग्राहकाने यापूर्वी अनेकदा जिल्ह्यातील काजूगर चाखला असेल तरच त्याला जिल्ह्यातील आणि परदेशातील काजूमधील फरक समजु शकतो.

त्यामुळे सहसा ही बाब कुणाच्याही लक्षात येत नाही. त्याचाच फायदा काही लोक घेत आहेत. मोठ्या प्रमाणात काजू बी आयात करून जिल्ह्यात प्रकिया केली जाते. तो सर्व काजू जिल्ह्यातीलच असल्याचे भासविले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील मुळ चवदार काजूची बदनामी होत आहे. 

परदेशातून आलेल्या काजू गरांच्या पाकिटावर ठिकाणाचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे. अशा पध्दतीची सक्ती करण्यासाठी बागायतदारांनी चळवळ उभी करावी. जिल्ह्यातील आणि परदेशातील काजूतील फरक दर्शविला जाईल, त्यावेळी आपसुकच जिल्ह्यातील चवदार काजूस मागणी वाढलेली असेल. त्याचा फायदा नक्कीच बागायतदारांना चांगला दर मिळण्यासाठी होऊ शकेल. 

जिल्ह्यात अनेक प्रकारच्या काजू बी उपलब्ध होतात. सध्या वेंगुर्ला 4 आणि 7 काजू कलमांचे प्रमाण अधिक असले तरी यापुर्वी वेंगुर्ला 1, 2, 3, 5, 6, 8 ची लागवड केलेली आहे. 

गावठी काजुचे हवे स्वतंत्र मार्केटिंग 
जिल्ह्यातील वैभववाडी, दोडामार्ग, कणकवली तालुक्‍यातील काही गावांमध्ये अजूनही गावठी काजूची झाडे आहेत. बहुतांशी झाडे जंगलात आहेत. त्या झाडांना कधीही खत किंवा त्यावर कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या जात नाहीत. झाडांचा पालापाचोळा हेच त्या झाडांचे खत आहे. त्यामुळे अशा उत्पादनाला नैसर्गिक तथा सेंद्रीय काजूचा दर्जा मिळणे आवश्‍यक आहे. या काजूला अप्रतिम चव असते. पण आकाराने बी लहान असल्याने संपूर्ण नैसर्गीक असलेल्या या काजू बीला मात्र दर इतर काजूपेक्षा कमी दिला जातो. त्यामुळे गावठी काजूचे स्वतंत्र मार्केटिंग होणे आवश्‍यक आहे. 

एक नजर 
* पॅकिंगवर काजूविषयीचे वर्गीकरणे हवे 
* भेसळ रोखण्यासाठी यंत्रणेची गरजेचे 
* गावठी काजूला सेंद्रीय म्हणून मान्यता हवी 
* काजूतील फरक स्पष्ट करणारी चळवळ राबविण्याची गरज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problem With Cashew In Sindhudurg Due To Adulteration