काजू पिकांत पानगळीची समस्या आहे ? मग वाचा हा सल्ला...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील काजू पिकात पानगळ आणि फांद्या वाळण्याची समस्या भेडसावत आहे. या संदर्भात कृषि विभागाचे अधिकारी व कृषि विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील काजू बागायतींची पाहणी केली अन् शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील काजू पिकात पानगळ आणि फांद्या वाळण्याची समस्या भेडसावत आहे. या संदर्भात कृषि विभागाचे अधिकारी व कृषि विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील काजू बागायतींची पाहणी केली अन् शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रोगग्रस्त काजू झांडांची गळालेली पाने बागायतीपासून दूर नेऊन जाळण्याचा सल्ला यावेळी कृषि विभागामार्फत बागायतदारांना देण्यात आला.

रोगग्रस्त झाडांवरील पाने सुरुवातीस पिवळे पडतात. त्यानंतर पानावर देठ, मध्यशिर आणि उपशिर तपकिरी होतात. अशी पाने चार ते पाच दिवसात पूर्ण गळून पडतात. जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे आणि आद्रतेमुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर कृषि विभागाने शेतकऱ्यांना  उपाययोजना सूचवल्या आहेत.

पानगळीवर कृषी विभागाचा सल्ला - 

  • रोगग्रस्त बागेतील रोगामुळे गळून पडलेली पाने बागेपासून दूर खोल खड्ड्यात गाडून टाकावीत किंवा जाळून टाकावीत.
  • रोगाने बाधीत झालेल्या फांद्या कापून काढाव्यात.
  • रोगाचा प्रादुर्भाव किती अंतरापर्यंत आहे याचा विचार करुन फांदी कापताना संपूर्ण रोगग्रस्त वाळलेला भाग आणि त्यापुढे सुमारे 10 से. मी. जीवंत भाग असेल अशा ठिकाणी फांदी गोलाकार कापावी.
  • फांदी कापलेल्या भागावर त्वरीत बोर्डोपेस्टचा लेप द्यावा.
  • रोगग्रस्त फांद्या बागेपासून दूर अंतरावर जमा करुन नष्ट कराव्यात
  • बागेची आणि झाडाची स्वच्छता केल्यानंतर बुरशी नाशक फवारणी घ्यावी

पानगळ समस्येवर अशी करा फवारणी - 

फवारणीसाठी मेटॉलेक्झील 8 टक्के, मेन्कोझेव 64 टक्के हे घटक असणारे संयुक्त बुरशीनाशक परिणामकारक आहे. हे बुरशीनाशक 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी, फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी, पुढील वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर 8 ते 15 दिवसांनंतर उघडीप पाहून 1 टक्के बोर्डोमिश्रणाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी

भातावरील निळे भुंगेरे नियंत्रणासाठी करा ही फवारणी -

भातावर पडणाऱ्या निळे भुगेरे रोगासाठी सारपरमेथीन किंवा लॅमडा 10 लीटर पाण्यात 5 मि.ली. या प्रमाणे पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी व  वाफ्यातील पाणी काढून टाकावे, तर करपा रोगासाछी बावीस्टीन, कार्बनडेझीन 1 लीटर पाण्यात 1 ग्रॅम या प्रमाणे पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी, असा सल्ला कृषि विभागातर्फे देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problems of Leaf burn in cashew nuts? Then read this advice