भावी शिक्षक नैराश्‍येत ; भरती प्रक्रिया अजूनही जैसे थे

the process of teachers recruitment stopped now its satisfaction of future candede in sindhudurg
the process of teachers recruitment stopped now its satisfaction of future candede in sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : दहा वर्षांपासून स्थगित भरतीच्या १२ हजार १४० पदांच्या जाहिराती २२ फेब्रुवारी २०१९ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांतील केवळ ५ हजार ५१ जागांचीच भरती झाली. प्रत्यक्षात मात्र ३ हजार ६६७ एवढेच उमेदवार हजर झाले; मात्र भरतीची पुढील प्रक्रिया वर्षभरानंतरही ‘जैसे थे’ असल्याने संभ्रमाबरोबरच नैराश्‍येचे वातावरण असून शिक्षक भरतीचे कागदी घोडे काही केल्या पुढे सरकत नसल्याने प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील सुमारे एक लाखाहून अधिक बांधव पुढील निवड यादीच्या प्रतीक्षेत आहेत. तरी अनेकांचे विहित केलेले वयोमान उलटत असल्याने बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

एनसीटीईने टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा आजन्म असल्याचे सूतोवाच केले होते. नुकतीच टीईटी परीक्षा एकदाच द्यावी लागेल, अशी घोषणाही करण्यात आली. त्यामुळे या आधी पात्र विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यातच वेळकाढू भरतीमुळे वयोमानासह पात्रता परीक्षेची मुदत सुद्धा समाप्त होत आली असल्याने विद्यार्थ्यांवर दुहेरी दडपण आहे. समांतर आरक्षण अंतर्गत उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त जागा त्या प्रवर्गातील खुल्या उमेदवारामधून भरल्या होत्या. तथापि उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील याचिकेचा ३ फेब्रुवारीचा न्यायालयीन आदेश विचारात घेऊन समांतर आरक्षणात ३५ उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करायची आहे.

माजी सैनिक या अरक्षणांतर्गत रिक्त जागा त्याच प्रवर्गातील खुल्या प्रवर्गात रूपांतरित करून तसेच गैरहजर, अपात्र व रिक्त जागा तसेच रुजू न झालेल्या उमेदवारांमधून १४०० रिक्त पदांसाठी निवड यादी लागणे बाकी आहे. सरकारने मागासवर्गीय पदे कपात केली, त्यात सुमारे साडेचार ते सहा हजार पदे रिक्त आहेत. मुलाखतींसह पसंतीक्रम निवडलेल्या ३ हजार ३१ पदांसाठी सुमारे ३० हजार ३०० अभियोग्यता धारकांना संधी मिळणार आहे; परंतु वित्त विभागाने शासन निर्णय ४ मे २०२० अन्वये पदभरतीस बंदी घातली आहे. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ही शिक्षक भरती शिक्षण विभागास परवानगी मिळणे आवश्‍यक आहे; मात्र महाविकास आघाडी सरकार मागील सरकारप्रमाणेच शिक्षक भरतीबाबत नकारात्मक भूमिकेत आहे.

शासन प्रतिकूल शिक्षक भरतीस विशेष परवानगी मिळावी म्हणून जीवन काकडे, संदीप कांबळे, संतोष मगर या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली; परंतु प्रशासन त्याबाबत काय भूमिका घेत आहे यावर सर्वांचे लक्ष लागून होते; पण पदरी निराशाच पडली. शिक्षणमंत्र्यांनी वेळ मारून नेण्याचे काम केले. भरतीचे तोंडी आश्‍वासन दिले; मात्र नेहमीप्रमाणे काहीच कार्यवाही झाली नाही. ही शिक्षक भरती २०२० ची नसून ती २०१९ ची असल्याने नवीन बंदीच्या नियमातून शिक्षक भरती वगळावी म्हणून अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे अभियोग्यता धारक पाठपुरावा करत आहे. वेळोवेळी निवेदने देत आहे.

ट्‌विटरद्वारे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत. तरी शिक्षण आयुक्तालयातून गेलेल्या प्रस्तावाला मान्यता देऊन न्याय द्यावा, अशी मागणी अभियोग्यताधारक करत आहेत. शाळा सुरू झाल्यशिवाय शिक्षक भरती कशी करता येईल? या वाक्‍याने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना विद्यार्थ्यांनी बरेच ट्रोल केले. तरी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आशा निर्माण झाल्या आहेत. राज्यातील इतर प्रश्‍न मार्गी लागत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष का करत आहेत? शिवाय ग्रामविकास मंत्र्यांचे लेखी आदेश असून त्यास कॅबिनेटला मान्यता का मिळत नाही? याप्रश्‍नी शिक्षणमंत्री गायकवाड यांची भूमिका डळमळीत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
 

शासनाचे उदासीन धोरण

कोरोना पार्श्‍वभूमीमुळे शाळा कधी सुरू होतील? याबाबत निश्‍चित कालावधी सांगता येत नसला तरी २०१९ पासून चालू असणाऱ्या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पवित्र या ऑनलाईन प्रणालीवरील सगळा डेटा तयार आहे. फक्त निवड यादी लागणे बाकी असताना शासनाच्या उदासीन धोरणामुळे नैराश्‍येचे वातावरण आहे. किमान या निवड याद्या लावाव्यात तसेच नियुक्‍त्या कोरोनाची स्थिती निवळून शाळा सुरू होतील तेव्हा द्याव्यात, अशी मागणीही होत आहे.

"राज्यातील शैक्षणिक स्थितीसाठी सध्या ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय ठेवला असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी थोडक्‍यात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मर्यादा येत असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाल्याचे दिसते. त्यामुळे शिक्षक भरतीस पर्याय नाही. तत्काळ प्रक्रिया पूर्ण करून निवड याद्या प्रसिद्ध कराव्यात. जिल्ह्यात पाचशेहून अधिक जागा रिक्त असताना पहिल्या टप्प्यात प्राथमिकची पदेच भरली नाहीत, ती भरावीत."

- भाग्यश्री रेवडेकर, अभियोग्यताधारक

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com