कोकणातील रहस्यांचा पाठलाग करणारी, शेतकरी - गावकऱ्यांनी साकारली वेबसिरीज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

पुढे जे घडते, ते पाहण्यासारखे आणि धम्माल उडवून देणारे आहे.

रत्नागिरी : तंत्रज्ञानाशी सलगी नसलेल्या पण अंगात प्रचंड हौस असलेल्या देऊड-चाटवणवाडी येथील साध्या-भोळ्या शेतकरी गावकऱ्यांनी अस्सल संगमेश्‍वरी बोलीतील गूढकथा ‘रानभूल’ वेबसिरीजद्वारे साकारली आहे. यात कोकणातील रहस्यांचा पाठलाग असून लवकरच यू ट्यूबवर झळकणार आहे.

गणपतीपुळेजवळचे देऊड हे निसर्गरम्य गाव. दरवर्षी चाटवणवाडीत गावपूजेला नाटक, नमन करतात. परंतु गतवर्षी कोरोनामुळे ते करता आले नाही. लॉकडाउनमध्ये या ग्रामस्थांनी वेबसिरीज करण्याचे ठरवले. त्याकरिता स्वामी समर्थ प्रॉडक्‍शनची साथ मिळाली. यापूर्वी समर्थ प्रॉडक्‍शनने ‘कोकणचा साज.. संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याद्वारे आणि ‘अक्रित झो मरनाच्या भायरं बेफाट’ या वेबसिरीजमुळे चांगलीच लोकमान्यता मिळविली होती. रत्नागिरीत सध्या अनेक ठिकाणी बिबट्या गावात येतो आणि रानभूल कथेला प्रारंभ होतो. त्यानंतर पुढे जे घडते, ते पाहण्यासारखे आणि धम्माल उडवून देणारे आहे.

हेही वाचा - तसा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे ; विनायक राऊत

रानभूलची कथा, पटकथा, संवाद संगमेश्वरी बोलीतून लेखक अमोल पालये यांनी लिहिले आहेत. याकरिता अनिल गोनबरे, राजू गोनबरे, रमेश गोनबरे, विवेक मुंडेकर, चैतन्य मुंडेकर, सुनील किंजळे यांनी ठाम भूमिका घेतली. कवी सचिन काळे आणि गायक-अभिनेते सुनील बेंडखळे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. सुभाष मुंडेकर हे वेबसिरीजचे निर्माते आहेत. दिग्दर्शन सचिन काळे, संगीत गणेश घाणेकर, प्रकाशयोजना शेखर मुळे, छायाचित्रण प्रसाद पिलणकर व पंकज गोवळकर, संकलन मयुर दळी, मंगेश मोरे करत आहेत. वेबसिरीजचे क्रिएटिव्ह हेड सुनील बेंडखळे आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: produce a web series on kokan life by kokan farmers in ratnagiri