esakal | काजू तारण योजनेत किलोमागे 40 रुपये नफा 
sakal

बोलून बातमी शोधा

Profit Of Rs 40 Per Kg In Cashew Mortgage Scheme Ratnagiri Marathi News

शेतमाल तारण योजनेत चार वर्षांपूर्वी काजू बी चा समावेश केला होता. ऐन हंगामात मोठ्याप्रमाणात काजू बी उपलब्ध होत असल्यामुळे दरावर परिणाम होतो. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. काजू बी व्यवस्थित सुकवून गोडावूनमध्ये ठेवली तर पावसाळ्यानंतर त्याला चांगला दर मिळतो.

काजू तारण योजनेत किलोमागे 40 रुपये नफा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - शेतमाल तारण योजनेंतर्गत कृषी बाजार समितीने ठेवलेल्या काजू बीला प्रतिकिलो 100 ते 105 रुपये दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे सुमारे 40 रुपयांचा फायदा झाला आहे. कोरोना कालावधीत काजूच्या दरावर मोठा परिणाम झालेला होता. 

शेतमाल तारण योजनेत चार वर्षांपूर्वी काजू बी चा समावेश केला होता. ऐन हंगामात मोठ्याप्रमाणात काजू बी उपलब्ध होत असल्यामुळे दरावर परिणाम होतो. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. काजू बी व्यवस्थित सुकवून गोडावूनमध्ये ठेवली तर पावसाळ्यानंतर त्याला चांगला दर मिळतो. शेतकऱ्यांना लागणारे आर्थिक साह्य कर्ज रुपाने बाजार समितीमार्फत केले जाते. गेले दोन वर्षे या योजनेला रत्नागिरी जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा कोरोनामुळे अनेक अडथळे निर्माण झाले होते. प्रकिया करणाऱ्या कंपन्यांकडून दरच मिळाला नाही.

व्यापाऱ्यांकडूनही कमी दरात काजू बी विकत घेतली जात होती. एप्रिल, मे या दोन महिन्यात काजू बीचा दर 60 ते 90 रुपये होता. त्यानंतर वेंगुर्ला बीचा दर 110 रुपये किलोपर्यंत वधारला. शेतकऱ्यांनी याला प्रक्रिया कंपन्यांना जबाबदार ठरवले होते. याच कालावधी बाजार समितीने 56 रुपये किलो दराने तारण योजनेंतर्गत काजू बी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले. 
गतवर्षी किलोचा दर 80 रुपये होता. बाजारपेठेतील दर पाहूनच यंदा बाजार समितीने तारणाचा दर निश्‍चित केला.

त्यानुसार जिल्ह्यातील 14 शेतकऱ्यांनी 90 टन काजू बी तारण म्हणून ठेवली होती. त्यापोटी 50 लाख 53 हजार रुपये कर्ज स्वरुपात शेतकऱ्यांना देण्यात आले. तीन महिन्यानंतर ही काजू बी हळूहळू विक्रीला काढली जात आहे. कोरोनामुळे अजुनही काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली नसली तरीही दिवाळी तोंडावर आल्यामुळे काजू बीला मागणी वाढणार आहे. त्यामुळे प्रतिकिलो 100 ते 105 रुपये दराने तारण ठेवलेली बी विक्रीला काढली जात आहे. आतापर्यंत 50 टन बीची विक्री झाली आहे. प्रतिकिलोला चाळीस रुपये फायदा शेतकऱ्यांना मिळालेला आहे. 

loading image