
रत्नागिरीत यावर्षी पाण्याचा योग्य निचरा
रत्नागिरी - शहराला दर पावसाळ्यामध्ये सतावणाऱ्या नालेसफाईला पालिकेने जोरदार सुरुवात केली आहे. मुख्य तोरण नाल्यासह शहरातील अनेक नाल्यांची जेसीबी आणि सुमारे सव्वाशे कायम आणि ठेकेदार पद्धतीवर घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांतर्फे ही सफाई सुरू आहे. मुख्य बाजारपेठेतील तुंबलेल्या नाल्यांची सफाई झाल्यामुळे यावर्षी बाजारपेठेत पाणी भरणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मारुती आळी भागात गटारच शिल्लक राहिले नव्हते. अखेर पंधरा दिवस तेथे काम करून नवीन गटार बांधण्यात आले. त्यामुळे यंदा बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता कमी असल्याचा दावा केला जात आहे.
पावसाळा आला की, शहरवासीयांसह व्यापाऱ्यांना मुख्य चिंता सतावते ती बाजारपेठेत यंदा पाणी भरणार की नाही याची. दरवर्षी बाजारपेठेत वरवरची नालेसफाई केली जाते आणि पावसाळ्यात नेहमी बाजारपेठेत गुडघाभर पाणी भरून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. शहराला समुद्राच्या दिशेने नैसर्गिक उतारा असला तरी दरवर्षी पाणी भरण्याची ही ओरड कायम आहे. पालिका पावसापूर्वीची तयारी म्हणून शहरातील नाले सफाईवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करते; परंतु मतांच्या बेरजांसाठी झालेली ती सफाई असल्याचे पाणी भरले की, ते पुन्हा पुन्हा लक्षात येते. गेल्या पावसाळ्यात पुन्हा शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी भरले होते. त्याचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊन सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले होते.
तत्कालीन आरोग्य सभापती निमेश नायर यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आणि मुख्य बाजारपेठेतील सर्व गटारांची साफसफाई केली. अतिक्रमणामुळे अनेक गटारे तुंबली होती. अतिक्रमण तोडून त्यांचीही सफाई केली. मारूती आळी भागात गटारच शिल्लक राहिले नव्हते. अखेर पंधरा दिवस तेथे काम करून नवीन गटार बांधण्यात आले. त्यामुळे यंदा बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता कमी असल्याचा दावा केला जात आहे. मुख्य तोरण नाल्यासह महत्त्वाची रस्त्यालगतची गटारे साफ केली जात आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूने समुद्राला मिळणाऱ्या गटाराची सफाईदेखील सुरू केली आहे. मांडवी येथे जेसीबीने ही साफसफाई सुरू आहे. पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला असून, त्यांच्यामार्फत प्रभावी कामकाज सुरू आहे. त्यामुळे यंदा मुख्य बाजारपेठ व अन्य भागात पाणी भरण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
Web Title: Proper Drainage Of Water In Ratnagiri This Year
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..