
जिल्ह्यात किल्ल्यांची पडझड सुरू झाली आहे. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने किल्ल्यांची तटबंदीपासून मूळ ढाचाही अनेक ठिकाणी ढासळला आहे. शासनाने आता किल्ल्यांच्या मजबुतीकरणावर शासनाने जोर दिला आहे.
पावस ( रत्नागिरी ) - रत्नागिरी जिल्ह्यातील 27 किल्ल्यांपैकी पुरातत्त्व विभागामार्फत सात किल्ले संरक्षित केले आहेत. दोन किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून पूर्णगड किल्ल्याचे काम पूर्ण झाले आहे. तर बाणकोट किल्ल्याचे काम सुरू आहे. पुरातत्व विभागाकडून अन्य किल्ल्यांचीही पाहणी करण्यात येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील महिपतगड आणि दापोली गोवा किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
जिल्ह्यात किल्ल्यांची पडझड सुरू झाली आहे. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने किल्ल्यांची तटबंदीपासून मूळ ढाचाही अनेक ठिकाणी ढासळला आहे. शासनाने आता किल्ल्यांच्या मजबुतीकरणावर शासनाने जोर दिला आहे. जिल्ह्यात 27 किल्ले आहेत. यातील खेड तालुक्यातील रसाळगड, मंडणगड तालुक्यातील बाणकोट, रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड, राजापूर तालुक्यातील यशवंतगड, गुहागर तालुक्यातील गोपाळगड, दापोली तालुक्यातील गोवा किल्ला, संगमेश्वर तालुक्यातील महितपगड हे किल्ले पुरातत्व विभागाकडून संरक्षित केले आहेत.
रत्नागिरीतील पूर्णगड आणि बाणकोट, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतगड आणि भरतगड या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून 17 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यातील पूर्णगड किल्ल्याचे काम पूर्ण झाले आहे.
लोकसहभागातून देखभालीसाठी हालचाली
सामाजिक दायित्व अंतर्गत लोकसहभागातून गडकिल्ल्यांची देखभाल करण्यासाठी पुरातत्व विभागाने पावले उचलली आहेत. यातून गडकिल्ल्याचे पावित्र्य जपण्याबरोबरच जतन, संवर्धन व संरक्षण करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दापोलीतील गोवा आणि रत्नागिरीतील पूर्णगड किल्ल्यांची देखभाल केली जाणार आहे. पुण्यातील दोन उद्योजकांनी याची जबाबदारी स्वीकारली असून किल्ल्याच्या दररोजच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.