खाड्यातील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर

राजेश शेळके
Monday, 5 October 2020

खाड्यांचा गाळ काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास जिल्ह्यातील या खाड्या मोकळा श्‍वास सोडणार आहेत. एवढेच नव्हे, तर खाडीच्या मुखावर होणारे अपघात टळणार आहेत. पर्यावरणदृष्ट्या सागरी संपत्तीला ते पोषक ठरणार आहे.

रत्नागिरी - वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्याने गाळात रुतलेल्या समुद्री खाड्या धोकादायक बनल्या आहेत. अनेक ठिकाणी मच्छीमारांना या खाड्यांच्या मुखातुनच किनाऱ्यावर येण्याचा मार्ग आहे. मात्र खाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका दुर्घटनाग्रस्त होत आहेत. या दुर्घटना टाळण्यासाठी सहायक मत्स्य संचालक विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 20 खाड्यामधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. 

खाड्यांचा गाळ काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास जिल्ह्यातील या खाड्या मोकळा श्‍वास सोडणार आहेत. एवढेच नव्हे, तर खाडीच्या मुखावर होणारे अपघात टळणार आहेत. पर्यावरणदृष्ट्या सागरी संपत्तीला ते पोषक ठरणार आहे. जिल्ह्यात विस्तिर्ण समुद्रा किनारा लाभला आहे. त्यामुळे खड्यांचे प्रमाणही मोठे आहे. खाड्यांमधुन मासेमारी केली जाते. यावर अनेक मच्छीमारांचा उदर्निवाह चालतो. सागरी जीवानाही प्रजनन काळात खाड्यांमधील आसरा फायदेशीर ठरतो. मात्र वर्षानुवर्षे या खाड्यांमधील गाळच काढला गेला नाही. त्यामुळे खाड्यांच्या मुखाशी असणाऱ्या गाळामध्ये अनेक नौका, होड्या अपघातग्रस्त झाल्या आहेत. भरती-ओहोटीच्या वेळी दांडी लागत असल्याने अनेक होड्या दुर्घटनाग्रस्त होतात. त्यामध्ये काहीजणांचा बळीही गेले आहेत. 

मिऱ्या, भाट्ये, मालगुंड, खंडाळा, दाभोळ, हर्णै, नाटे आदी खाड्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेतुन या 20 खाड्यातील गाळ उपसला जावा, येत्या अधिवेशनामध्ये यावर निर्णय व्हावा, या साठी विस्तृत आराखडा तयार केला आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सहायक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले तसेच अधिकारी संतोष देसाई, परवाना अधिकारी रश्‍मी आंबुलकर, आदींनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आयुक्त अतुल पाटणे, प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गाळ उपसण्याचा आराखडा तयार केला आहे. 

मच्छीमारांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. म्हणून प्रधानमंत्री मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 20 खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांना सादर केला आहे. 
- नागनाथ भादुले, 
सहायक मत्स्य संचालक, रत्नागिरी 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal To Remove Silt From Creek Submitted To Fisheries Commissioner