‘इशारे पे इशारे’ ; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत चुरस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

तरीही सत्ताधारीच विरोधकांची भूमिका साकारत असल्याचे चित्र आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कुर्म गतीने सुरू असलेले काम असो अथवा चिपळूण आगाराच्या नवीन इमारतीचे रखडलेले काम. या समस्यांबाबत गेल्या दोन महिन्यांत प्रामुख्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनाचे ‘इशारे पे इशारे’ देण्यात आले. आंदोलने झालीच नाहीत. समस्याही तशाच राहिल्या. त्यामुळे आंदोलन पुकारणाऱ्या नेत्यांच्या डरकाळ्या हवेत विरल्याची चर्चा आता ऐकायला मिळत आहे. 

हेही वाचा - शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर -

शेखर निकम राष्ट्रवादीचे आमदार आहेत. हक्काचे आमदार असतानाही राष्ट्रवादीचे पदाधिकारी विविध ठिकाणच्या समस्येबाबत निवेदने देत आंदोलनाचे इशारे देत होते. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, कामथे उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, भातशेती नुकसान भरपाई, चिपळूण आगाराचे रखडलेले काम आदीविषयी  निवेदने देण्यात आली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते व सहकाऱ्यांनी मागील काही दिवसात निवेदन देण्याचा सपाटाच लावला होता.

आंदोलनाची हाक देणारी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी आहे. तरीही सत्ताधारीच विरोधकांची भूमिका साकारत असल्याचे चित्र आहे. चिपळूण आगाराच्या नवीन इमारतीचे काम रखडलेले आहे. ५५ लाखांचा निधी खर्च झाला तरी अद्याप इमारतीचा पाया भरलेला नाही. या प्रकरणी देखील राष्ट्रवादीने उपोषणाचा इशारा दिला होता; मात्र काम सुरू करण्याचे आश्‍वासन मिळाल्याने ते थांबले.

सेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनीही श्राद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावर प्रशासकीय बैठकाही झाल्या. त्यांनाही काम सुरू करण्याचे आश्‍वासन मिळाल्याने श्राद्ध घालण्याचा उपक्रम १२ दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे चिपळूण मतदार संघाचे तालुकाप्रमुखांनीही खेर्डी, खडपोली एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग आणि कामथे उपजिल्हा रुग्णालयासंबंधी इशारे दिले; मात्र त्यातून फारशी कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे नेत्यांचे इशारे म्हणजे पोकळ डरकाळी ठरत आहे.

हेही वाचा -  आता शिक्षण विभाग होणार हायटेक ; भविष्यनिर्वाह निधीची माहिती एका क्‍लिकवर -

"राज्यात शिवसेना सत्ताधारी असल्याने स्थानिक स्तरावर रखडलेली लोकोपयोगी कामे मार्गी लागण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. चिपळूण आगार नवीन इमारतीसाठी ५५ लाखांचा निधी खर्च झालाय. तरी कामात कसलीच प्रगती नाही. शासन विकासकामांना निधी देतेयं; मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने आम्हाला नाइलाजाने आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागते."

- संदीप सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख, गुहागर विधानसभा मतदारसंघ

 

संपादन - स्नेहल कदम 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for protest in shivsena and rashtravadi congress not done in ratnagiri chiplun