कोकण पुनरुज्जीवनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा - डॉ. राजेंद्रसिंह

कोकण पुनरुज्जीवनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा - डॉ. राजेंद्रसिंह

चिपळूण - कोकणात पावसाचे मोठे प्रमाण असताना उन्हाळ्यात अनेक गावांत पाणीटंचाई जाणवते. विविध पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाणी अडवून त्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर करावा. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून नद्यांबरोबरच कोकणच्या पुनरुज्जीवनासाठी लोकसहभागातून विविध प्रकल्प राबविण्याची गरज आहे, असे मत जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी साखर येथील कार्यक्रमात व्यक्त केले.

खेड तालुक्‍यातील साखर येथे नववर्षाच्या सुरवातीस रविवारी महाश्रमदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी प्रदीप पी., तालुका कृषी, जलसंधारण विभागाचे अधिकारी, कोकणभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, कार्याध्यक्ष मनोहर सकपाळ आदी उपस्थित होते. 

साखर येथील महाश्रमदान शिबिरासाठी पंधरागाव परिसरातील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ, विविध संस्था, मंडळाचे पदाधिकारी महिन्याभरापासून तयारी करीत होते. साखर येथे सकाळी आठपासून श्रमदानास सुरवात झाली. विद्यार्थी व ग्रामस्थांनी बंधारा  कामासाठीचे साहित्य घरातूनच आणले होते. येथील नदीवर दिवसभरात एकूण १३ बंधारे घालण्यात आले. यात गॅबियन बंधाऱ्याचाही समावेश आहे. गॅबियन बंधाऱ्यासाठी लोकसहभागातून साहित्य उपलब्ध केले. बंधाऱ्यासाठी घातलेल्या दगडावर तिन्ही बाजूंनी लोखंडी घट्ट जाळी लावण्यात आली. यासाठी खास मुंबईहून तज्ज्ञ महाश्रमदान शिबिरात सहभागी झाले होते.

लोखंडी जाळी लावल्याने पाण्याची साठवणूक होऊन त्याचा हळूवार निचरा होण्यास मदत होते. यासाठी ठराविक अंतरावर बंधारे घालण्यात आले. जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनीही बंधाऱ्यांसाठी मार्गदर्शन करीत महत्त्वाच्या टिप्स दिल्या. 

विभागीय कोकण आयुक्त म्हणाले, लोकसहभागातून पावसाचे पाणी अडवून त्याचा वापर केल्याशिवाय आर्थिक समृद्धी शक्‍य नाही. माझ्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावात ३५० मिमी पाऊस होतो. लोकसहभागातून गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचे प्रयत्न झाले. स्थितीला संपूर्ण गावातील शेती ओलिताखाली आली असून शेतकरी समृद्ध झाल्याचे स्पष्ट केले. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, त्यास शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्‍वासन दिले. 

बंधाऱ्याचे नियोजन
यापुढे कोकण समृद्धी अभियानात छोट्या नद्यावर दगडी बांध, गॅबियन बंधारे, जंगलातील जमिनीवर आडवे चर मारून पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, सिमेंट नाला बांध, नदीतील गाळ काढणे, शेततळी, जलकुंभ व मोठ्या नदीवरील बंधाऱ्याचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com