झटपट निकाल ! विनयभंग प्रकरणी अवघ्या पाच दिवसांत शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेडकॉन्स्टेबल एस. के. बेर्डे यांनी अवघ्या एका दिवसात तपासकाम पूर्ण करून बुधवारी (ता. 4) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

रत्नागिरी - विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केल्यापासून अवघ्या पाच दिवसांत त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. रत्नागिरीतील अतिजलद न्याय प्रक्रियेचे तसेच पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. सोमवारी (ता. 2) झालेल्या प्रकारात ग्रामीण पोलिसांनी तत्काळ केलेल्या कारवाईनंतर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोन वर्षे सक्षम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. 

प्रथमेश बाबूराव नागले (वय 24, रा. पिंरदवणे, वाडाजुन - रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना सोमवारी घडली होती. आरोपी प्रथमेश नागले याने पीडित तरुणी दुचाकीवरून घरी परतत असताना तिचा पाठलाग केला. तिच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी करून तिला अडविले. तिच्याजवळ त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. तिला स्वतःच्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तरुणीने गोंगाट केला. आरोपीने पळून जाताना तिच्याशी गैरवर्तन केले. पीडित तरुणीने याबाबतची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 3) दिली. त्याच दिवशी त्याला अटक केली.

झटपट अशी झाली तपासणी

ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेडकॉन्स्टेबल एस. के. बेर्डे यांनी अवघ्या एका दिवसात तपासकाम पूर्ण करून बुधवारी (ता. 4) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तरुणीने दिलेली माहिती ही तिने तत्काळ दिलेली असल्याने आणि तिच्या पुराव्याला पुष्टी देणाऱ्या दोन साक्षीदारांचा पुरावा व तपासिक अंमलदार यांनी नोंदविलेल्या घटनास्थळाचा पंचनामा, नकाशा, आरोपीचा जप्त केलेला मोबाईल यांच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा, त्याने केलेल्या गुन्ह्याचे कृत्य सिद्ध होते, असा निर्णय न्यायालयाने दिला. 

सर्व गुन्ह्यांसाठी स्वतंत्र शिक्षा

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या पाच दिवसांच्या कमी कालावधीत निकाल झाला. मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. इतकलकर यांनी आरोपीला दोषी धरले. या सर्व गुन्ह्यांसाठी स्वतंत्र शिक्षा देण्यात आली. आरोपीला न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि एकूण 20 हजार दंड ठोठावला. दंडाच्या रकमेतून 15 हजार रुपये पीडित तरुणीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. या प्रकरणी सरकारी वकील एस. एस. वाधवणे यांनी काम पाहिले. पोलिस हवालदार ए. बी. जाधव, एस. एस. मोरे यांनी सहकार्य केले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punishment Within Five Days For Breach Of Modesty Case