`तो` आला अन् त्याने जिंकले...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

ग्रामीण भागामध्ये पेरणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना पावसाची आवश्‍यकता होती; मात्र अपेक्षेनुसार या आठवड्यात पाऊस झाल्याने बळीराजा थोडासा नाराज झाला होता.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दोन-तीन दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यानंतर आज दुपारच्या सुमारास जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा मात्र सुखावला. दिवसभर विजेचा खेळखंडोबा झाला. नागरिकांना विजेअभावी समस्यांना सामोरे जावे लागले. 

जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला होता; मात्र नंतर त्याने दडी मारली. गेले तीन ते चार दिवस अधून-मधून पावसाच्या सरींचा शिडकावा पाहावयास मिळाला होता. ग्रामीण भागामध्ये पेरणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना पावसाची आवश्‍यकता होती; मात्र अपेक्षेनुसार या आठवड्यात पाऊस झाल्याने बळीराजा थोडासा नाराज झाला होता.

गेले दोन दिवस तर कडक ऊन पडत होते. जिल्ह्यात आज दुपारनंतर पावसाने झोडपले. जिल्ह्याच्या काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. दुपारच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत होणार, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा ठप्प होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rain came again konkan sindhudurg