एकीकडे कोरोना तर दुसरीकडे आसमानी संकट

rain dodamarg konkan sindhudurg
rain dodamarg konkan sindhudurg

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - तालुक्‍याला वादळी वाऱ्यांसह आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. पाऊस कमी असला तरी पाळये, मोर्ले, घोटगेवाडी या पट्ट्यात वादळी वाऱ्यामुळे खूप मोठे नुकसान झाले. अनेकांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या. घरालगतची झाडे, छत, पडवी आणि घराजवळच्या वाहनांवर पडून मोठे नुकसान झाले. नुकसानीचा आकडा 50 लाखांच्या पुढे असल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे. हा प्रकार काल (ता. 10) सायंकाळी उशिरा घडला. एकीकडे कोरोनाचे संकट, तर दुसरीकडे आसमानी संकट त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत.

तालुक्‍यात वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेले दोन दिवस उष्णता वाढण्याबरोबरच अधूनमधून ढगाळ वातावरण होते. काल (ता. 10) सायंकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी हलका पाऊस पडला. दोडामार्ग शहर परिसर, मणेरी, आंबेली, सासोली येथे बऱ्यापैकी पाऊस झाला. आंबेली कोनाळकरवाडीपासून साटेली-भेडशी परिसरात पावसाने हलकासा शिडकावा केला; तर तिलारीच्या पुढच्या गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मोर्ले, घोटगेवाडी परिसरात हजारो केळीबागा जमीनदोस्त झाल्या.

पाळये तिठा परिसरातही वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. तेथील अरुण बाबली शेटकर आणि हरिश्‍चंद्र लक्ष्मण शेटकर यांची झाडे कोसळली. केळी भुईसपाट झाल्या. घराच्या पडवीवर झाड पडल्यानेही मोठे नुकसान झाले. वादळामुळे पत्रे उडाले. छत तुटून पडले. घराजवळ उभ्या केलेल्या दुचाकीवर झाडाच्या फांद्या कोसळल्याने नुकसान झाले. जनावरांसाठी राखून ठेवलेले गवत वाऱ्याने दूरवर नेऊन टाकले आणि भिजले. शिवसेनेचे कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी आपदग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली. 

दरम्यान, या वाऱ्याचा सर्वाधिक फटका घोटगेवाडी आणि पाळये परिसराला बसला. घोटगेवाडीत एकाच ठिकाणी दहा हजार केळीबागा जमीनदोस्त झाल्या. शिवाय, आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या केळी, पोफळी, काजू, आंबा, फणसाची झाडेही मोडून उन्मळून पडली. पाळये तिठ्याजवळही अनेकांचे नुकसान झाले. नुकसानीचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे. यात ढगांचा गडगडाट आणि वादळी वारेही वाहत होते. घोटगेवाडी, पाळये परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. त्यामुळे भटवाडी येथील के. बिजू, मिलिंद आणि नितीन मणेरीकर, संतोष मोर्ये यांच्या जवळपास दहा ते अकरा हजार केळीबागा जमीनदोस्त झाल्या. माजी सरपंच प्रेमानंद कदम यांच्या सुमारे 300 केळीबागा, शेटकर यांच्या 200 हून अधिक केळीबागा, पाळये तिठ्यावरील मायकल लोबो यांच्या 250 केळीबागा, शिवाय अनेक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. बिजू यांनी लाखो रुपये खर्च करुन स्प्रिंकलर बसविले होते, तेही मोडले. कामगार तर जीवाच्या भीतीने झोपडीतील टेबल आणि कॉटखाली लपून बसले होते. 

वादळी वाऱ्यामुळे शेती बागायतीच्या नुकसानीचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. 

पुन्हा पावसाची शक्‍यता 
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा गडगडाटासह पावसाची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे. त्या अनुषंगाने आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com