esakal | म्हणून कोकणातला 'हा' बंधारा झाला शांत..
sakal

बोलून बातमी शोधा

rain, flood affected in sakharinate port in ratnagiri

नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच प्रतिकूल हवामानामध्ये मच्छीमारी करण्याचे मच्छीमारांनी टाळले

म्हणून कोकणातला 'हा' बंधारा झाला शांत..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : नारळी पौर्णिमेमुळे समुद्राला आलेले उधाण, त्यातून समुद्रामध्ये येणाऱ्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला सोसाट्याचा वारा या प्रतिकूल वातावरणाचा नव्या हंगामाच्या मुहूर्ताला मच्छीमारांना फटका बसला. गेल्या काही दिवसांपासून प्रतिकूल वातावरणामध्ये कमालीचे सातत्य आहे. त्यामुळे वातावरण बदलण्याची मच्छीमारांकडून प्रतीक्षा केली जात आहे. साखरीनाटे बंदरामध्ये नेहमी दिसणारा मच्छीमारांचा कोलाहाल काहीसा थंड आहे. 

साखरीनाटे बंदरात दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी सुमारे पंचवीस पर्सनेट, दीडशे ते दोनशे फिशिंग ट्रॉलर, शंभर यांत्रिक होड्या,  सुमारे पन्नास बिगर यांत्रिक होड्या असे मिळून तीनशेहून अधिक मच्छीमार नौका मच्छीमारी करतात. पावसाळ्याच्या आरंभाचा काळ हा माशांचा प्रजननकाळ असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून मच्छीमारी करण्यास शासनाकडून प्रतिबंध होता.

हेही वाचा - रत्नागिरीतील 56 धरणे झाली फुल्ल ; गडनदी आणि अर्जुना प्रकल्प शंभर टक्के पाणी साठा...

मात्र, मच्छीमारी बंदीचा काळ संपला असून गत आठवड्यापासून नव्या हंगामाला सुरवात झाली आहे. नव्या हंगामाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसत आहे. त्यातून मच्छीमार व्यवसायातून वर्षाला सुमारे शंभर कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल होणाऱ्या साखरीनाटे बंदरामध्ये गेल्या सात-आठ दिवसांमध्ये केवळ पंधरा ते वीस लाखांचीच उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

‘कॉड एन्ड’च्या जाळीने

नव्या हंगामामध्ये पर्ससिनद्वारे मच्छीमारी करण्यास परवानगी नाही. त्यामुळे मच्छीमारांकडून ट्रॉलिंगने मच्छीमारी केली जात आहे. मच्छीमारीच्या नव्या नियमाप्रमाणे चाळीस आसाची ‘कॉड एन्ड’ जाळीने मच्छीमारी करावयाची आहे. शासनाकडून ती जाळी वापरण्याची सक्ती होत आहे. मात्र, नव्या नियमाप्रमाणची ही जाळी मच्छीमारांना उपलब्ध होत नाही.  

हेही वाचा -  चावा घेतला, की बोबडी वळलीच समजा..

नारळी पौर्णिमेमुळे समुद्राला आलेले उधाण आणि त्याच्या जोडीने सोसाट्याचा वाराही वाहत आहे. त्यातच, पाण्याला काही प्रमाणात करंट अशा प्रतिकूल स्थितीमध्ये समुद्रामध्ये मच्छीमारी करणे मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच प्रतिकूल हवामानामध्ये मच्छीमारी करण्याचे मच्छीमारांनी टाळले.  
- अमजद बोरकर, मच्छीमार नेते

संपादन - स्नेहल कदम

loading image